विद्यार्थ्यांची शाळाच असेल दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:48+5:302021-03-21T04:08:48+5:30
- कोरोना संक्रमणाचा परिणाम : शाळा, कॉलेजलाच करावे लागेल परीक्षांचे नियोजन - नव्या परीक्षा पॅटर्नची घोषणा, बोर्ड पाठवेल प्रश्नपत्रिका ...
- कोरोना संक्रमणाचा परिणाम : शाळा, कॉलेजलाच करावे लागेल परीक्षांचे नियोजन
- नव्या परीक्षा पॅटर्नची घोषणा, बोर्ड पाठवेल प्रश्नपत्रिका
- दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा रद्द, १२ वी विज्ञानचे प्रॅक्टिकल झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा वेग बघता बोर्डाने परीक्षा पॅटर्नमध्ये परिवर्तन केले आहे. शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नव्या पॅटर्नची घोषणा केली. त्यानुसार विद्यार्थी ज्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, तेथेच त्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना दुसऱ्या शाळेत अथवा कॉलेजमध्ये परीक्षा देण्यास जाण्याची गरज पडणार नाही. प्रश्नपत्रिका बोर्ड पाठविणार आहे. शाळा, महाविद्यालयांनाच परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे.
या दोन्ही वर्गाच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहाव्या वर्गाची लिखित परीक्षा २९ एप्रिल ते २० मे व १२ व्या वर्गाची लिखित परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान होईल. नव्या पॅटर्ननुसार यावेळी लिखित परीक्षेकरिता वेगळे केंद्र नसतील. विद्यार्थ्यांना संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा होणार नाही. प्रॅक्टिकलऐवजी विद्यार्थ्यांना असाईनमेंटस् दिल्या जातील. हे असाईनमेंटस् २१ मे ते १० जूनदरम्यान जमा करावे लागणार आहेत. १२ व्या वर्गाच्या लिखित परीक्षेनंतर विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा २२ मे ते १० जूनदरम्यान होतील. कोरोना संक्रमण बघता प्रॅक्टिकलचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. ही माहिती संबंधित महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाईल. आर्ट्स, कॉमर्स व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना लिखित परीक्षेनंतर १५ दिवसाच्या आत असाईनमेंटस् जमा करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल किंवा असाईनमेंटस्च्या काळात कोणी विद्यार्थी किंवा त्याचे कुटुंबीय कोरोना संक्रमित आढळले किंवा त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदी लागू झाली असेल अशास्थितीत त्यांना १५ दिवसाचा अवधी वाढवून दिला जाईल.
------------
उत्तरपत्रिकेसाठी मिळेल अतिरिक्त वेळ
दरवर्षी ८० अंकांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तासाचा वेळ दिला जात होता. नव्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. ४० व ५० गुणांचा पेपर सोडविण्यासाठी १५ मिनिट अतिरिक्त वेळ दिला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ दिला जाईल.
------------
विशेष परीक्षेचे होईल आयोजन
परीक्षेदरम्यान विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळला किंवा लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देऊ शकला नाही तर त्याच्यासाठी जून महिन्यात विशेष परीक्षेचे आयोजन केले जाईल.
------
पूरक परीक्षेचे आयोजन जुलैमध्ये
बोर्डाकडून पूरक परीक्षेचे आयोजन जुलै-ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शहरात निश्चित स्थळांवर व ग्रामीण क्षेत्रात तालुका मुख्यालयातच परीक्षा केंद्र बनविले जातील.
-----------
पालक झाले चिंतामुक्त
परीक्षेबाबत राज्य सरकारने स्थिती स्पष्ट केल्यामुळे पालक चिंतामुक्त झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये कोरोना संक्रमण वाढायला लागल्याने आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे पालकवर्ग चिंतित होता. परीक्षा होणार की नाही, ही भीती त्यांना सतावत होती. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबतही त्यांचा तणाव वाढत होता.
--
परीक्षेच्या तारखा
दहावीची लिखित परीक्षा : २९ एप्रिल ते २० मे
बारावीची लिखित परीक्षा : २३ एप्रिल ते २१ मे
दहावीची असाईनमेंट : २१ मे ते १० जून
बारावी विज्ञानचे प्रॅक्टिकल : २२ मे ते १० जून
बारावीच्या इतर शाखेतील असाईनमेंट : लिखित परीक्षेनंतर १५ दिवसाच्या आत
.............