पोरांनी ९० टक्के गुण प्राप्त केले, शिष्यवृत्तीची राशी कधी देणार?; बार्टीची टाळाटाळ
By निशांत वानखेडे | Published: August 31, 2023 05:12 PM2023-08-31T17:12:32+5:302023-08-31T17:13:21+5:30
डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना कागदावरच
नागपूर : दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी प्रतिवर्ष १ लक्ष रुपये शिष्यवृत्ती देण्याची घाेषणा सामाजिक न्याय विभागाने केली होती. विद्यार्थ्यांनी हवे तेवढे गुण प्राप्त करूनही दाेन वर्षापासून शिष्यवृत्तीचा एक पैसाही मिळाला नाही.
हाेतकरू विद्यार्थ्यांना क्षमता असूनही केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आयआयटी, इंजिनीअरिंग यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाता येत नाही. या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठीच मोठा खर्च करावा लागतो. शिवाय अभ्यासक्रमात प्रवेश केल्यानंतर तेथील खर्च करणेही शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. त्यामुळे उच्च शिक्षणात अनुसूचित जातीच्या मुलांची घट होते.
ही अडचण लक्षात घेता राज्य सरकारने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू केली होती. यात व्यावसायिक अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी दोन वर्षासाठी प्रतिवर्ष १ लक्ष रुपये प्राेत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली.
मात्र दोन वर्षापासून ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा एक पैसाही मिळाला नाही. शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी याबाबत बार्टीच्या महासंचालकांना निवेदन सादर करून या गाेष्टीकडे लक्ष वेधले आहे. बार्टीद्वारे अशा पात्र विद्यार्थ्यांकडून अर्जही मागविण्यात आले होते. मात्र दोन वर्षे लोटूनही विद्यार्थ्यांच्या पदरात शिष्यवृत्तीची रक्कम पडली नाही. याकडे बार्टीने तातडीने लक्ष देऊन पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी राजानंद कावळे यांनी केली. बार्टीने लक्ष दिले नाही तर आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला.