विद्यार्थ्यांनो, टॅलेंट दाखवा जग तुमचेच आहे!
By admin | Published: January 30, 2015 12:51 AM2015-01-30T00:51:34+5:302015-01-30T00:51:34+5:30
महाविद्यालयीन जीवन हे आयुष्यातील महत्त्वाची फेज असते. खरा विद्यार्थी येथेच घडतो. मित्रांनो, तुमच्यात जे असलेले ते टॅलेंट दाखवा, जगाचे व्यासपीठ तुमच्यासाठी खुले आहे,
सिनेअभिनेता श्रेयस तळपदे : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-१५’
यवतमाळ : महाविद्यालयीन जीवन हे आयुष्यातील महत्त्वाची फेज असते. खरा विद्यार्थी येथेच घडतो. मित्रांनो, तुमच्यात जे असलेले ते टॅलेंट दाखवा, जगाचे व्यासपीठ तुमच्यासाठी खुले आहे, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता श्रेयस तळपदे यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला.
यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘युफोरिया-२०१५’ या वार्षिक स्नेहसंमेलनात गुरुवारी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रेयस तळपदे बोलत होता. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांनीही विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा होते. यावेळी संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, संयोजक प्रा. पंकज पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचे महाविद्यालयात आगमन होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. आपल्या भाषणाची सुरुवात श्रेयसने ‘मेहुणे मेहुणे यवतमाळचे पाहुणे’ अशी केली. श्रेयस म्हणाला, या महाविद्यालयातील वातावरण पाहून एका कुटुंबात आल्याचा आनंद होत आहे. येथील विद्यार्थ्यांसारखी एनर्जी मला महानगरातील विद्यार्थ्यांमध्येही दिसली नाही. येथील प्राचार्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच जण उत्साही आणि कल्पक आहेत. अशा वातावरणाचा तुम्ही आपल्या आयुष्यासाठी फायदा करून घ्या. तुम्ही तुमचे टॅलेंट दाखविले तर जग तुमच्यासाठी खुले आहे. आपल्या आगामी ‘बाजी’ चित्रपटाबद्दल बोलताना श्रेयसने बाजी हा मराठी चित्रपटांचे सर्व विक्रम मोडीत काढील, असा विश्वास व्यक्त केला. ‘गोलमाल’ आणि ‘बाजी’मधील संवाद सादर केला.
अमृताने विद्यार्थ्यांना जिंकले
अमृता खानविलकर म्हणाली, या ठिकाणी येऊन खूप मजा येत आहे. महाविद्यालयीन जीवन म्हणजे आयुष्याचे सोनेरी क्षण असते, याचा आनंद तुम्हाला मिळत आहे, हे तुमचे अहोभाग्य आहे. अमृताने ‘नटरंग’मधील ‘आता वाजले की बारा’ या लावणीवर नृत्य करून विद्यार्थ्यांना जिंकून घेतले.
जितेंद्र म्हणतो, आपल्यातील ‘बाजी’चा शोध घ्या
जितेंद्र जोशी यांनी ‘तुमची एनर्जी पाहून आपण पागल झालो’ अशा शब्दात आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपण जसे आहोत तसेच प्रेझेंट करणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच माणसाचे खरे गुण कळून येतात. प्रत्येक क्षेत्रात एक ‘बाजी’ असतो, त्या बाजीचा शोध महाविद्यालयीन जीवनातच घेतला जाऊ शकतो. यावेळी विद्यार्थ्यांच्या खास आग्रहावरून ‘हंबरून वासराले चाटते जवा गाय’ ही कविता सादर केली. यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून शिवानी बिहाडे, वैष्णवी देशपांडे, श्रुती देशमुख, प्रियंका कनॉय, अश्विनी बोरा, सुखदा धर्माधिकारी, अश्विन त्रिपाठी, अभिलाष सन्याल, अक्षय वंजारी, श्वेता मेहता, काजल छाबडा, गरिमा चुडिवाले यांच्यासोबत सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून दत्ता ढोबळे, नितीन अलोणे, प्रा. पी.जी. कौशिक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हीना पाबानी यांनी केले. आभार प्रा. पंकज पंडित यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे- विजय दर्डा
खासदार विजय दर्डा म्हणाले, प्रत्येक माणसात क्षमता असते. ती क्षमता ओळखण्याची गरज आहे. अशा विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून महाविद्यालय त्याला संधी देईल. या संधीचे सोने विद्यार्थ्यांनी करावे, असे सांगत जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.