विद्यार्थ्यांचा घरच्या घरी अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:59+5:302021-04-28T04:08:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या वतीने ‘शाळा बंद, शिक्षण ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. वाढत्या संसर्गामुळे शासनाच्या वतीने ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ असा उपक्रम शिक्षण विभागाकडून सातत्याने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण निरंतर सुरू राहावे, याकरिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेअंतर्गत समतादूत प्रकल्प रामटेक तालुका व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘विद्यार्थ्यांचा घरच्या घरी अभ्यास’ यावर परिचर्चा घेण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून पालकांमध्ये जनजागृती केली गेली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने उपस्थित हाेत्या. त्यांनी शासकीय कामे सांभाळून शिक्षक अध्यापनास तयार असून, पालकांनी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून आपल्या मुलांना प्रेरित करून शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण यांनी ‘शाळाबाहेरील शिक्षणात पालकांची भूमिका’, गणेश बेलखुडे यांनी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’, ‘शाळाबाहेरील शिक्षण कसे पूर्ण करावे’, ज्योती चौरे यांनी ‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर’, केंद्रप्रमुख संध्या झिले यांनी ‘शासकीय स्तरावरून पुरविलेल्या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा-आढावा’, सपना मानकर यांनी ‘शाळाबाह्य शिक्षणात शिक्षकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ. श्रीकांत भाेवते यांनी तंत्रज्ञान सहाय्य केले. कार्यक्रमाचे संचालन समतादूत राजेश राठोड यांनी केले तर आभार जया राठोड यांनी मानले.
पालकांनी विद्यार्थ्यांना किमान एक तास तरी अभ्यासाला बसवावे. टिली-मिली, स्वाध्यायमाला, मिस काॅल द्या आणि गाेष्ट ऐका, गाेष्टीचा शनिवार, शिक्षकांनी दिलेल्या स्वाध्याय पुस्तिका, दीक्षा ॲपचा वापर, घर हीच प्रयोगशाळा, हसत-खेळत घरच्या घरी शिक्षण आदी बाबींच्या आधारे पालकांनी आपल्या मुलांना घरच्या घरी अभ्यासास प्रवृत्त करावे, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला असंख्य शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.