विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या झळा
By admin | Published: February 25, 2016 03:16 AM2016-02-25T03:16:49+5:302016-02-25T03:16:49+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊस यामुळे गेल्या वर्षी (सन २०१४-१५) नागपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
आशिष सौदागर कळमेश्वर
निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळी पाऊस यामुळे गेल्या वर्षी (सन २०१४-१५) नागपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्याला मिळणाऱ्या सुविधांपैकी परीक्षा शुल्क माफी ही एक आहे. मात्र असे असताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा मंडळाने परीक्षा शुल्क आधीच घेतले होते. परंतु ते दुष्काळ जाहीर झाल्यानंतर परत करण्यात आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे.
नागपूर जिल्ह्याची आणेवारी २०१४-१५ मध्ये ५० पैशाच्या खाली होती. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यासंदर्भात १५ जानेवारी २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यातील १ हजार ७९५ गावांना दुष्काळग्रस्तांना मिळणारा लाभ देण्यात यावा, असे या आदेशाद्वारे सांगितले होते.
यानुसार, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, परीक्षा शुल्कात माफी (इयत्ता १० वी व १० वी), रोहयोअंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सुविधा पुरविण्यात याव्या, असे निर्देश शासनाने जीआरद्वारे दिले होते. या निर्देशानुसार २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात नागपूर जिल्ह्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणे अपेक्षित होते. मात्र परीक्षा शुल्क घेण्यात आले. विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क नंतर परत करणे आवश्यक होते, मात्र परीक्षा मंडळाने तसे केले नाही. अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्यात आले नाही. नागपूर जिल्ह्यात २०१४-२०१५ या शैक्षणिक सत्रात दहावीच्या परीक्षेसाठी ६९ हजार ३६३ विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी ५७ हजार ६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या १ लाख २६ हजार ४३८ विद्यार्थ्यांकडून परीक्षा मंडळाने परीक्षा शुल्क घेतले. परंतु शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर ते परत देण्यास शिक्षण मंडळाने अद्याप पाऊल उचलले नाही.
नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, नरखेड, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कुही आणि नागपूर ग्रामीण या १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, हे विशेष! या तालुक्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून ३५५ रुपये तर १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ३४० रुपये प्रती घेण्यात आले होते.