विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांना ‘टार्गेट’

By admin | Published: April 16, 2015 02:10 AM2015-04-16T02:10:54+5:302015-04-16T02:10:54+5:30

दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Students 'Target' for Students | विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांना ‘टार्गेट’

विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांना ‘टार्गेट’

Next

अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचे आव्हान : महाविद्यालयांचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’
योगेश पांडे ल्ल नागपूर

दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विद्यार्थ्यांचा दुष्काळ मिटविण्यासाठी महाविद्यालयांकडून निकाल लागायला बराच अवधी असतानादेखील शोधमोहीम सुरू झाली आहे. महाविद्यालयांकडून ‘मार्केटिंग’चे विविध फंडे सुरू झाले असून चक्क प्राध्यापकांनादेखील ‘टार्गेट’ देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१४-१५ या वर्षात राज्यभरात ४० टक्क्यांहून अधिक तर एकट्या नागपूर विभागात ४५ टक्के जागा रिक्त होत्या, हे विशेष.

राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘जेईई-मेन’ (जॉईन्ट एन्ट्रन्स एक्झाम) १० व ११ एप्रिल रोजी पार पडली. परंतु गेल्या वर्षीची रिक्त जागांची संख्या लक्षात घेता अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षांच्या अगोदरपासूनच विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले.
बारावीच्या अनेक परीक्षा केंद्रांवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रतिनिधी संस्थेचे माहितीपत्रक वाटताना दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘जेईई’च्या परीक्षेच्या दिवशी तर चक्क प्राध्यापक मंडळीदेखील अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर पालकांना महाविद्यालयांबाबत माहिती देताना दिसून आले. अनेक महाविद्यालयांनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे ‘टार्गेट’ दिले आहे. नागपुरातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांना प्रत्येकी पाच विद्यार्थी आणण्यास सांगितले आहे. यामुळे प्राध्यापक मंडळी चिंतित असल्याची माहिती एका जेष्ठ प्राध्यापकाने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.
राज्यातील ३६० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांत दीड लाखांहून अधिक जागा आहेत. मागील वर्षी यातील सुमारे ४० टक्के म्हणजे ६४ हजारांहून अधिक जागा रिक्त होत्या. गेल्या काही वर्षांपासून रिक्त जागांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. हीच बाब मोठ्या प्रमाणात उघडलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती पाहता महाविद्यालय प्रशासनांच्या चिंतेत निश्चितच आणखी भर पडली आहे. हीच बाब लक्षात घेता अनेक महाविद्यालयांनी ‘मॅनेजमेंट कोटा’तून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.

बाहेरील राज्यांकडे धाव
४जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी उपराजधानीतील महाविद्यालयांकडून निरनिराळ््या ‘मार्केटिंग’ फंड्यांचा वापर केला जात असून अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधींनी यासाठी उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेतली आहे. ‘एज्युकेशन फेअर’ तसेच थेट संपर्काच्या माध्यमातूनदेखील महाविद्यालयांकडून विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक महाविद्यालयांनी तर ‘कमिशन एजंट’देखील नेमले आहेत. अनेक जण विद्यार्थ्यांशी ‘आॅनलाईन’ संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिकवणी वर्गांकडे ‘फोकस’
४अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी राज्यभरात शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. हीच बाब लक्षात घेत काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिकवणीवर्ग चालकांशी संपर्क साधला आहे. कमी गुण मिळाले तर ‘मॅनेजमेन्ट कोटा’मधून तुम्हाला निश्चित प्रवेश देण्यात येईल, असे सांगत असताना विद्यार्थ्यांना विविध ‘आॅफर्स’देखील देण्यात येत असल्याची माहिती आहे.
दर्जा टिकविण्याची गरज
४अनेक खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. याचे कारण म्हणजे तेथील दर्जा. प्रवेशासाठी महाविद्यालये कुठल्या ‘मार्केटिंग’ फंड्याचा उपयोग करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर त्यांनी दर्जावर भर दिला तर त्यांना धावपळ करण्याची गरज भासणार नाही, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Students 'Target' for Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.