नागपुरात नायलॉन मांजाने कापला विद्यार्थ्याचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:36 PM2020-12-30T19:36:03+5:302020-12-30T19:38:20+5:30
Nylon Manza, student's throat cut बुधवारी सकाळी १० वाजता शकीलनगर, गोधनी येथे राहणारा आदित्य संतोष भारद्वाज (वय १७) हा १२ व्या वर्गातील विद्यार्थी बाईकने एमएससीआयटीच्या ट्युशनला जात असताना गोधनी-मानकापूर रोडवरील दोसा कॉर्नरपुढे नायलॉन मांजाने गळा कापला गेला आणि गाडीवरून पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजाने लोकांचे गळे कापले जात आहेत. विनाकारण रक्त सांडले जात आहे आणि प्रशासन केवळ दोन-चार विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा देखावा निर्माण करते. हे दरवर्षीचे चित्र आहे. जेव्हा प्रत्यक्ष शासन-प्रशासन यंत्रणेत बसलेल्यांच्या घरच्यांचे गळे कापले जातील तेव्हा यांना जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागपूरकर विचारत आहेत. ‘लोकमत’ने नायलॉन मांजाचा हा विषय सातत्याने लावून धरला आहे. मात्र, जुजबी कारवाईनंतर संबंधितांनी या विषयाकडे कानाडोळा केला. बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आता थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे, हीच योग्य कारवाई ठरणार आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता शकीलनगर, गोधनी येथे राहणारा आदित्य संतोष भारद्वाज (वय १७) हा १२ व्या वर्गातील विद्यार्थी बाईकने एमएससीआयटीच्या ट्युशनला जात असताना गोधनी-मानकापूर रोडवरील दोसा कॉर्नरपुढे नायलॉन मांजाने गळा कापला गेला आणि गाडीवरून पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ गोधनी येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर केले. नागरिकांनी त्याला मानकापूर चौकातील ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये भरती केले. आदित्यच्या गळ्यातून रक्तप्रवाह थांबत नसल्याने आणि गळा जास्तच चिरला गेल्याने तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. सध्या तो अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
पाच महिन्याआधीच वडिलांचा मृत्यू
आदित्य हा आई अंजू, भाऊ अक्षत व आजीसोबत राहतो. त्याचे वडील संतोष भारद्वाज यांचा मृत्यू जुलै महिन्यात कोरोनामुळे झाला. घरातील एकमेव कमावता व्यक्ती कोरोनाला बळी पडल्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंजू भारद्वाज यांच्यावर आली. त्या स्वयंपाकाचे काम घेऊन कुटुंब आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सांभाळत आहेत. अशा स्थितीत मुलाचा झालेला हा भयंकर अपघात, त्या माऊलीला वेदनेसह चिंतामग्न करीत आहे. समाजाकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे.
मांजा बाजारात येतोच कसा?
बंदी असतानाही नायलॉन मांजा बाजारात येतोच कसा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे धागेदोरे शोधण्यात मात्र संबंधित यंत्रणा अपयशी ठरलेल्या दिसतात. हा मांजा किरकोळ आणि ऑनलाईन स्वरूपात सर्रास विकला जात आहे, तो ग्राहकांकडून घेतलाही जात आहे आणि या मांजाने पतंग उडवून लोकांचे गळे कापलेही जात आहेत. कायद्याचे उल्लंघन केले जात असून, त्यांच्याविरोधात केवळ मिळमिळीत कारवाई केली जात आहे. नागरिकांचे मांजामुळे बळी जात असताना, त्यांच्यावर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न आता ज्वलंत होत चालला आहे.
जोवर प्रशासन कठोर भूमिका घेत नाही, तोवर हा मांजा विकलाच जाणार. आदित्यची ही घटना अगदी माझ्यासमोरचीच आहे. त्यामुळे, नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई हवी.
विजय पाठेकर, प्रत्यक्षदर्शी
ही माझ्याकडे येणारी पाचवी केस आहे. दैवकृपेने ते सगळे वाचले. आदित्यची स्थिती मात्र जास्तच गंभीर होती. नायलॉन मांजामुळे होत असलेल्या या घटना भयंकर आहेत. प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.
- डॉ. चव्हाण
‘लोकमत’ने वारंवार घातलेय डोळ्यात अंजन
नायलॉन मांजा असो वा पीओपी मूर्ती विक्री... याबाबत ‘लोकमत’ने वारंवार शासन-प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. नायलॉन मांजाबाबत सातत्याने सदर चालविले आहेत. आदित्यच्या प्रकरणावरूनही आम्ही नागरिकांना नायलॉन मांजा हद्दपार करण्याचे आवाहन करीत आहोत.
गडकरींकडे मदतीचे आवाहन
आदित्यच्या कुटुंबीयांची स्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. आदित्य हा होतकरू विद्यार्थी असून, त्याच्या मदतीसाठी समाजमनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सोशल माध्यमाद्वारे केले जात आहे.
उड्डाणपुलांवर बांधले होते तार
- आ. अनिल सोले हे महापौर असताना त्यांनी नायलॉन मांजापासून दुचाकीस्वारांचा बचाव होण्यासाठी एक वेगळाच उपाय योजला होता. उड्डाणपुलांवर दोन्ही बाजुला असलेल्या विजेच्या खांबांना तार बांधण्यात आली होती. त्यामुळे कटलेला पतंगासोबत जाणारा मांजा थेट पुलावर न येता आधी त्या तारावर रोखला जात होता. कालांतराने चोरट्यांनी काही पुलावर बांधलेली तारही चोरून नेली. महापालिकेने या उपायाकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे.
अशी घ्या काळजी
नायलॉन मांजासंदर्भात कारवाई कधी होईल, हे देवच जाणे. मात्र, नागरिकांनीही वाहन चालविताना स्वत:ची काळजी घेणे अनिवार्य आहे. हेलमेटमुळे बहुतांशी संरक्षण होणारच आहे. त्यामुळे, त्याचा वापर आवश्यक आहे. सोबतच गळ्याभोवती दुपट्टा वापरणे, वाहन हळू चालविणे, रस्त्याच्या मधातून वाहन चालविणे टाळणे कारण बरेचदा मांजा आडवा आला की चालक दांदरतो आणि त्यामुळे वाहनांची धडक होऊ शकते.
मांजाचा वापर होताना दिसताच पोलिसांना कळवा
बरेचदा पोलीस कारवाई करत नाहीत, अशी आरोळी आपण ठोकतो. मात्र, बहुतांश प्रकरणात नागरिकच पोलिसांना सहकार्य करत नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी कोणी नायलॉन मांजाचा वापर करत पतंग उडविताना दिसला तर लागलीच पोलिसांना संबंधित टोल फ्री क्रमांकावर कळवा. शिवाय, वस्त्यावस्त्यांमध्ये आपापल्या नगरसेवक, देवस्थान, मोहल्ला समित्यांच्या बैठकीत हा विषय गांभीर्याने ठेवला तर मोठ्या प्रमाणात सजगता वाढेल.
पतंंग पकडणे जीवावर बेतले
मंगळवारी वाडी बायपास मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७ वर्षीय अंश विकास तिरपुडे याचा मृत्यू झाला. वंश मंगळवारी दुपारी २.३० वाजता पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर आला होता. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या कारने त्याला चिरडले. वंश हा एकुलता एक मुलगा होता. १८ तासात ही दुसरी घटना असल्याने पोलीसह सजग झाले आहेत.