दीड वर्षांपासून बंद एमआरआयमुळे विद्यार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:50+5:302021-05-21T04:07:50+5:30

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेडिकलची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था ...

Students in trouble due to closed MRI for a year and a half | दीड वर्षांपासून बंद एमआरआयमुळे विद्यार्थी अडचणीत

दीड वर्षांपासून बंद एमआरआयमुळे विद्यार्थी अडचणीत

Next

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेडिकलची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र एकीकडे दीड वर्षांपासून ‘एमआरआय’ सारख्या अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णसेवा प्रभावित होत असताना दुसरीकडे, ‘रेडिओलॉजी’त पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. बंद ‘एमआरआय’मुळे आतापर्यंत सुमारे १० हजार रुग्णांना मेडिकलने खासगी किंवा मेयोचा रस्ता दाखविला आहे.

आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना ‘एमआरआय’ यंत्राच्या बाबतीत मात्र मेडिकल पिछाडीवर गेले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. मेडिकलमध्ये २००८ मध्ये ‘एमआरआय’ उपलब्ध झाले. विदर्भात हे एकमेव यंत्र होते. मेयोमध्येही एमआरआय नसल्याने या यंत्रावर रुग्णांचा मोठा भार होता. दहा वर्षानंतर एमआरआयची कालमर्यादा संपली. संबंधित कंपनीसोबत असलेले देखभालीचा कार्यकाळही संपला. यातच वारंवार हे यंत्र नादुरुस्त राहू लागल्याने त्यावर मोठा खर्च होऊ लागल्याने ते बंद केले. मेडिकल प्रशासनाने नवे एमआरआय खरेदी करण्याच्या प्रस्तावावर तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म विभागातून १६ कोटी रुपयांचा निधी दिला. मेडिकल प्रशासनाने यंत्र खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन कंपनीकडे हा निधी वळता केला. परंतु एक वर्षाचा कालावधी होत असतानाही ‘एमआरआय’ उपलब्ध होऊ शकले नाही.

-‘पीजी’च्या जागांसाठी ‘एमआरआय’ची अट

भारतीय विज्ञान परिषेदेने (एमसीआय) २०१८ मध्ये ज्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमआरआय’ नाही त्यांच्या ‘पीजी’चा जागा न वाढविण्याची भूमिका घेतली होती. यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रेडिओलॉजी विभागातील ‘डीएमआरडी’च्या दोन जागा रद्द झाल्या होत्या.

-पीजीच्या ४८ विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित

रेडिओलॉजी विभागाचा अभ्यासक्रमासाठी दरवर्षी मेडिकलमध्ये १६ विद्यार्थी प्रवेश घेतात. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात सध्या ४८ विद्यार्थी आहेत. यातील १६ विद्यार्थ्यांचे हे अंतिम वर्ष असून त्यांना ‘एमआरआय’वरील योग्य प्रशिक्षणाअभावीच परीक्षा देण्याची वेळ आली आहे. या विद्यार्थ्यांना मेयोत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते, असे म्हटले जात असले तरी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

-अनुभव व कौशल्य कसे प्राप्त होणार?

रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी मेडिकलमधील ‘एमआरआय’ बंद असल्याने अडचणीत आले आहेत. त्यांना एमआरआय’चा अनुभव व त्यावरील कौशल्य कसे प्राप्त होणार, हा प्रश्न आहे. या संदर्भात निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख व संचालक डॉ. तात्यराव लहाने यांच्याशी चर्चा केली. परंतु आश्वासनापलिकेडे अद्याप तोडगा निघाला नाही.

- डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष मार्ड, मेडिकल

Web Title: Students in trouble due to closed MRI for a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.