‘गर्लफ्रेंड’साठी विद्यार्थी झाले ‘लुटेरे’; पार्टी देण्यासाठी काढले होते ४० हजारांचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 08:39 PM2023-04-17T20:39:18+5:302023-04-17T20:39:53+5:30
Nagpur News ‘गर्लफ्रेंड’ला पार्टी देण्यासाठी पैसे हवेत यासाठी एका वृद्धेला घरात घुसून लुटणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर : ‘गर्लफ्रेंड’ला पार्टी देण्यासाठी पैसे हवेत यासाठी एका वृद्धेला घरात घुसून लुटणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्पित रत्नाकर पोटे (२२, दर्शन कॉलनी, नंदनवन) आणि धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे (२३, विजयालक्ष्मी पंडित नगर, रमणा मारुती) अशी आरोपींची नावे आहेत. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. अर्पितने प्रेयसीला पार्टी देण्यासाठी ४० हजारांचे कर्ज घेतले होते व पैसे जमा करण्यासाठी त्याने धनंजयच्या मदतीने हे पाऊल उचलले.
६७ वर्षीय सुधा कृष्णकुमार गहरवार या बेलतरोडी येथील नरेंद्र नगर येथे राहतात. त्यांचे पती बँकेत कायदेशीर सल्लागार आहेत. मुलगा आणि मुलगी अमेरिकेत डॉक्टर आहेत. १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता सुधा घरी असताना मुखवटा घातलेले दोन तरुण घरात आले. एकाने 'काका म्हणजे काय' असे विचारले. सुधा यांनी 'आधी शूज बाहेर काढ' असे म्हणताच तो तरुण बाहेर गेला व सहकाऱ्यासह परतला. त्याने सुधा यांच्या गळ्यावर चाकू ठेवला व जीवे मारण्याची धमकी देऊन आतील खोलीत नेले. तेथे रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी सुधा यांच्या गळ्यातील साखळी व आयपॅड हिसकावून पळ काढला.
या गंभीर घटनेमुळे पोलीस तपासात गुंतले. सीसीटीव्हीच्या तपासातून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अर्पित ऑनलाइन फूड डिलिव्हरीचं काम करतो आणि धनंजय कार वॉशिंगचं काम करतो. अर्पितने ३१ डिसेंबरला त्याच्या प्रेयसीला पबमध्ये पार्टी दिली होती. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे घेतले होते. त्याच्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज होते. तो पैसे परत करू शकला नाही. त्याने धनंजयला ही समस्या सांगितली. धनंजय हा गहरवार दाम्पत्याच्या घरी गाडी धुण्यासाठी येत असे. दोघेही एकटेच राहत असल्याचे त्याला समजले. सुधा दुपारी एकट्याच असतात हे त्याला माहीत होते. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवघरे, संदीप बुवा, अनिल मेश्राम, अविनाश ठाकरे, तेजराम देवळे, शैलेश बेदोडेकर, मनीष धुर्वे, मिलिंद पटले, प्रशांत गजभिये, सुहास शिंगणे, कमलेश गणेर, प्रशांत सोनुलकर, मंगेश देशमुख, विवेक श्रीपाद, वर्षा चंदनखेडे, दिपक तऱ्हेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.