विद्यार्थ्यांच्या भेटीला 'म्युझियम ऑन व्हील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:16 PM2019-10-31T23:16:52+5:302019-10-31T23:19:00+5:30
‘म्युझियम ऑन व्हील’ हे चालते-फिरते संग्रहालय मुलांच्या भेटीला येत असून, येत्या १८ नोव्हेंबर रोजी ते शहरात दाखल होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणतेही संग्रहालय इतिहासाची ओळख देणारे असतात. काळ झपाट्याने बदलत आहे. आधुनिक काळात आपला इतिहास विस्मृतीत जाऊ नये, इतिहासात घडलेल्या घडामोडींशी आपली नाळ जोडली राहावी म्हणून अशी संग्रहालये मदत करीत असतात. अनेकदा विद्यार्थ्यांमधील उदासीनता किंवा पालकांमध्ये जागृतीच्या अभावामुळे मुले संग्रहालयापर्यंत पोहचत नाही. पण हे संग्रहालय तुमच्यापर्यंत पोहचले तर... होय, असे चालते-फिरते संग्रहालय मुलांच्या भेटीला येत असून, येत्या १८ नोव्हेंबर रोजी ते शहरात दाखल होणार आहे.
चालते-फिरते संग्रहालय एका वातानुकूलित बसमध्ये असून, त्यात ऐतिहासिक वारसा बघायला मिळणार आहे. हे संग्रहालय १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान शहरात फिरणार असून, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक मेजवानी या रूपाने मिळणार आहे. मुंबईच्या शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या पुढाकाराने २० ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘म्युझियम ऑन व्हील’चा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला. या फिरत्या संग्रहालयात शोकेसेस, माहिती संच, कलासाहित्य, दृकश्राव्य साधने आणि टच स्क्रीन, डिजिटल टॅबलेटस्सारखी उपकरणे आहेत. बसमध्ये एका विशिष्ट विषयांवरील प्रदर्शन भरविण्यात येते जे नियमितपणे बदलले जातात. वस्तू तसेच देखावे प्रदर्शित असून माहिती संच तसेच डिजिटल उपकरणांद्वारे माहिती सांगितली जाते. या संग्रहालयातून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्या जात आहेत. यात शिक्षकांसाठी विशेष ‘द मिस्ट्री ऑफ लिव्हिंग फॉसिल्स’ म्हणजे जिवंत जीवाश्म या संकल्पनेची माहिती व निरनिराळ्या प्रजातींची ओळख कार्यशाळेतून मिळते. याशिवाय ज्वालामुखी उद्रेकाची प्रक्रिया व जीवाश्म अश्मचक्रात कसे बनतात, याबाबत प्रात्यक्षिक बसमध्ये सादर केले जाते. मिळालेल्या महितीनुसार, सर्व सोयीसुविधांनी युक्त हे बस संग्रहालय शहरातील विद्यार्थ्यांना भेटण्यास येत आहे. पहिल्या दिवशी हे संग्रहालय शहरातील मध्यवर्ती संग्रहालय(अजब बंगला) येथे राहणार असून, या ठिकाणी शिक्षकांसाठी विशेष सत्र ठेवण्यात येणार आहे. नंतर ही बस शहरातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयात भेट देणार आहे. मोठ्या चौकातही हे संग्रहालय लागणार असून, सामान्य नागरिकांना ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी मदत मिळेल.
२८ हजार किमीचा प्रवास, ७.५० लाख दर्शकांनी पाहिले
शिवाजी महाराज संग्रहालयातर्फे ‘म्युझियम ऑन व्हील’ सुरू केल्यानंतर या चालत्या-फिरत्या संग्रहालयाने आजवर २८ हजार ३४० किलोमीटरचा प्रवास पार केला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, लोणावळा आणि कोल्हापूर येथील एकूण २२५ शैक्षणिक संस्था आणि ३७ हून अधिक सार्वजनिक ठिकाणांना भेट दिली आहे. जवळपास ७ लाख ४४ हजार ४८५ दर्शकांनी संग्रहालयात ऐतिहासिक वारसा बघितला.