सीडीएस रावतांच्या शिस्तपाठाने विद्यार्थ्यांना मिळाली होती प्रेरणा; ‘लोकमत’ने घडवून आणली होती भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:10 AM2021-12-10T07:10:00+5:302021-12-10T07:10:02+5:30

Nagpur News बिपीन रावत यांनी लष्करप्रमुख असतानादेखील सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आपुलकीचा संवाद साधला आणि ती भेट सर्वांना आयुष्यभरासाठी शिस्तीचा वस्तुपाठ घडविणारी ठरली.

Students were inspired by CDS Rawat's discipline; The visit was arranged by Lokmat | सीडीएस रावतांच्या शिस्तपाठाने विद्यार्थ्यांना मिळाली होती प्रेरणा; ‘लोकमत’ने घडवून आणली होती भेट

सीडीएस रावतांच्या शिस्तपाठाने विद्यार्थ्यांना मिळाली होती प्रेरणा; ‘लोकमत’ने घडवून आणली होती भेट

Next
ठळक मुद्देशिष्टाचार दूर सारत शाळकरी विद्यार्थ्यांशी साधला होता संवाद

नागपूर : एरवी लष्करप्रमुख हे पद म्हटले की शिष्टाचार, सरकारी प्रक्रिया अन् साचेबद्ध पठडीतील संवाद असा सर्वसामान्यांमध्ये समज आहे. परंतु बिपीन रावत यांनी लष्करप्रमुख असतानादेखील सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आपुलकीचा संवाद साधला आणि ती भेट सर्वांना आयुष्यभरासाठी शिस्तीचा वस्तुपाठ घडविणारी ठरली. ‘लोकमत’च्या पुढाकाराने २०१८ साली या विद्यार्थी-विद्यार्थिनींना रावत यांची थेट भेट घेता आली होती व त्या भेटीतील प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरला होता.

लोकमत हवाई सफर स्पर्धेतील विजेत्या ५२ शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘लोकमत’ने देशातील विविध मान्यवरांशी भेट घडविण्याचा मानस केला होता. त्याअनुषंगाने ३० ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याशीदेखील विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळाली होती. लष्करप्रमुखांच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत लष्करप्रमुख एक अंतर ठेवूनच संवाद साधतील, अशी मुलांच्या डोक्यात कल्पना होती. परंतु रावत यांनी अतिशय उत्साहाने सर्वांचे स्वागत केले होते. बिपीन रावत सगळे शिष्टाचार दूर सारत मुलांमध्ये आले व त्यांच्यात मिसळून गेले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विद्यार्थी विविध ठिकाणी फिरून आले होते. रावत यांनी विद्यार्थ्यांकडून दिल्लीत कुठे कुठे भेटी दिल्या याची माहिती घेतली. त्याअगोदर विद्यार्थ्यांना त्यांनी नाश्ता केला की नाही याबाबत आपुलकीने विचारणा केली. दिल्लीतील भेट, पहिला विमानप्रवास याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या होत्या. विशेष म्हणजे रावत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली होती. किती जणांना लष्करात यावेसे वाटते, असे त्यांनी विचारल्यावर आपसूकच बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हात उंचावला होता. रावत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे सांगितले होते. लष्करप्रमुखांमधील जिव्हाळ्याचा पैलू या भेटीत विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला होता.

४०-५० टक्के गुण आहेत तरी लष्करात येऊ शकता

लष्करप्रमुखांशी विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने संवाद साधला होता. मला ४०-५० टक्के गुणच मिळाले तरी मी लष्करात येऊ शकतो का, असा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्यावर रावत यांनी अतिशय सविस्तरपणे उत्तर दिले होते. आमच्या वेळी तर ४०-५० टक्के गुण खूप जास्त असायचे. आताही खूप जास्त आहेत. लष्करात गुण नव्हे तर शारीरिक फिटनेस गरजेचा आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही एनडीएत प्रवेश घेऊ शकता. पदवीनंतर तुम्ही थेट लष्कराच्या कोणत्याही विंगमध्ये भरती होण्यासाठी अर्ज करू शकता. आयुष्यात व्यायाम व शिस्त या दोन बाबी कधीच सोडू नका, असा यशोमंत्रच रावत यांनी दिला होता.

Web Title: Students were inspired by CDS Rawat's discipline; The visit was arranged by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.