विद्यार्थीही आता म्हणतील,'मम्मी पापा यू टू'!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:20 PM2020-01-06T23:20:28+5:302020-01-06T23:21:06+5:30
विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी नागपूर महापालिका आणि वाहतूक पेलीस विभागाच्या वतीने ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान १३ ते १९ जानेवारी दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१३ मध्ये इंदूर महापालिकेचे प्रशासन नागपूर शहर बघण्यासाठी आले होते. येथील स्वच्छता बघून त्यांनी जनजागृती केली. लोकांची मानसिकता बलवण्यात त्यांना यश आले. आज स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूर शहर पहिल्या क्रमांकावर येवू शकते. तर आपल्या नागपूरचाही स्वच्छतेत अव्वल शहरात समावेश व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. यात लोकांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. विद्यार्थी आई-वडिलांच्या अनुकरणातून अनेक गोष्टी शिकतात. यालाच संस्कार म्हणतात. आई-वडिलांकडून एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर भावी पिढीही तशीच घडते. आता हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी नागपूर महापालिका आणि वाहतूक पेलीस विभागाच्या वतीने ‘मम्मी पापा यू टू’ हे अभियान १३ ते १९ जानेवारी दरम्यान नागपूर शहरात राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून आई-वडिलांना स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह असल्याने स्वच्छतेसोबतच वाहतून नियमांची जनजागृती करण्यात येईल. आई-बाबा, रस्त्यावर कचरा टाकू नका, ओला आणि सुखा कचरा विलग करूनच द्या, हेल्मेट घालूनच गाडी चालवा, उलट्या दिशेने गाडी चालवू नका, असे म्हणत आई-बाबांना विद्यार्थी विनवणी करणार आहे.असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषेदत दिली. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, अपर आयुकत राम जोशी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
३ लाख १० हजार विद्यार्थी सहभाग घेणार
‘मम्मी पापा यू टू’ या अभियानातून स्वच्छतेत लोकसहभाग वाढविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मनावर संस्कार घडविण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाणार आहे. विविध स्पर्धा तसेच रस्त्यावर उतरूनही नागरिकांना स्वच्छता आणि वाहतूक नियम पाळण्याबाबत आवाहन केले जाईल. स्वच्छता व वाहतूक नियम पाळावे, यासाठी १७ जानेवारीला मुख्य रस्त्यांवर व चौकात मानवी साखळी तयार करुन जनजागृती केली जाईल. यात शहरातील ३ लाख १० हजार विद्यार्थी सहभागी होतील.
लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक
मम्मी पापा यू टू या अभियानासंदर्भात लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांसोबत सोमवारी मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन येथे घेण्यात आली. महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सात दिवस स्पर्धा आणि उपक्रम
मम्मी पापा यू टू हे अभियान १३ ते १९ जानेवारी २०२०दरम्यान राबविण्यात येणार असून सात दिवस विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भरगच्च उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ८ जानेवारीला कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये शहरातील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यात मान्यवर मार्गदर्शन करतील.
सर्व शाळात पालक सभा
११ जानेवारीला सकाळी ९ वाजता शहरातील सर्व शाळांमध्ये पालक सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये मम्मी पापा यू टू या अभियानाबाबत उपस्थित पालकांना माहिती देण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. याप्रसंगी स्वच्छतेबाबत सादरीकरण, व्हीडिओ क्लिप, पोस्टर्स दाखविण्यात येणार असून वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
असे आहे अयोजन
१३ जानेवारी - शालेय विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा इयत्ता ५ ते ८ आणि इयत्ता ९ ते १२ दोन गटात स्पर्धा.
१४ जानेवारी - स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर या विषयावर पथनाट्य स्पर्धा इयत्ता ५ ते १२ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा.
१६ जानेवारी-शहर स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी आहे?या विषयावर वादविवाद स्पर्धा पालकांसाठी स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर या विषयावर रांगोळी स्पर्धा.
१७ जानेवारी-सकाळी ८.३० वाजता स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संदेश असलेले फलक घेऊ न शालेय विद्यार्थ्यांमार्फत शाळा परिसरात मानवी साखळी तयार करण्यात येईल.
१८ जानेवारी-इंदोर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर होऊ शकते, नागपूर का नाही? या विषयावर पालकांसाठी निबंध स्पर्धा.
१९ जानेवारी- सकाळी ९ ते १२ या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा.