चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार ऐतिहासिक गुणपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:32+5:302021-05-07T04:07:32+5:30
नागपूर : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने वर्षभरापासून पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांची शाळाच भरली नाही. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ...
नागपूर : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने वर्षभरापासून पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांची शाळाच भरली नाही. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आमूलाग्र बदल केले आहेत. ही गुणपत्रिका ऐतिहासिकच राहणार आहे.
या वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर अनेक नोंदी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना बऱ्याच शालेय माहितीपासून वंचित राहावे लागणार आहे. या वर्षी पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरली नसल्यामुळे एकूण कामाचे दिवस किती, विद्यार्थ्यांचे उपस्थिती दिवस किती, विद्यार्थ्याची उंची किती, त्याचे वजन किती, त्याला गुणपत्रिकेत कोणती श्रेणी प्राप्त झाली? या सर्व विषयांचा उलगडा होणार नाही. त्यामुळे गुणपत्रिकेवरील हे रकाने व त्याच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या आकारिक व संकलितच्या श्रेणीचा रकानादेखील राहणार नाही. हे सर्व रकाने रिक्त राहिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्याने किती प्रगती केली, त्याचा किती विकास झाला, त्याचा शैक्षणिक, शारीरिक, मानसिक विकास किती झाला, त्याने किती नैपुण्य गुण विकसित केले? या सर्व बाबतींत पालक, विद्यार्थी व शिक्षकही अनभिज्ञ राहणार आहेत. त्यामुळे ही गुणपत्रिका कदाचित विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक ‘ऐतिहासिक’ गुणपत्रिका म्हणावी लागेल.
- चौथीपर्यंतची शाळाच भरली नाही व विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणालाही पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे सर्वंकष मूल्यमापन करता आले नाही. यंदा मिळणाऱ्या गुणपत्रिकेत बरेच रकाने रिक्त राहणार आहेत.
- अजय भिडेकर, सहा. शिक्षक
- यंदा विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन हे आगळेवेगळेच होणार. नेहमीच्या गुणपत्रिकेपेक्षा बरेच शेरे या गुणपत्रिकेमधून वगळल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एक आगळावेगळा अनुभव नक्कीच मिळेल.
- जय येटरे, मुख्याध्यापक, अभंग उच्च प्राथमिक शाळा
- शासनाचे निर्देश शाळांना फॉलो करावे लागतील
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली आहे. पण, विद्यार्थ्यांना निकालही द्यायचा आहे. निकाल देताना शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी शाळांना करावी लागेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ४ ची विद्यार्थी संख्या)
अनुदानित - ३२५ विद्यार्थी संख्या ६३,३७७
विना अनुदानित - १२६ विद्यार्थीसंख्या २५,९००
नगर परिषद - ४५ विद्यार्थीसंख्या ६,४९७
जिल्हा परिषद - १,१४२ विद्यार्थीसंख्या ५६,३८७
स्वयंअर्थसहायित - ३२९ विद्यार्थीसंख्या ६३,७६०
महापालिका - ९२ विद्यार्थीसंख्या ६,५७३
- कंटाळा आला आता ऑनलािन शाळेचा. शाळेच्या वर्गमित्रांची खूप आठवण येते. सुरुवातीला ऑनलाइन शिक्षणाची खूप मजा यायची. पण, आता नको वाटते. आमच्या मॅडम वर्गात शिकवत असताना जी मजा यायची ती आता झुम क्लासमध्ये येत नाही.
- युगल दरवाई, विद्यार्थी ()
- आईबाबा बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. शाळेत मस्त खेळता येत होते. घरात बसून बसून कंटाळा आला आहे.
- माही तितरमारे, विद्यार्थिनी ()
- शाळा म्हणजे शाळाच असते. मित्र, मैत्रिणी, अभ्यास, खेळ याला आम्ही वर्षभर मुकलो. कोरोनाची भीती असल्याने घराबाहेरही पडता येत नाही. आम्ही जाम कंटाळलो आहोत. कोरोना लवकरात लवकर जावा आणि शाळा सुरू व्हावी.
- उन्नती केदार, विद्यार्थिनी ()