शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय विद्यार्थ्यांना पास मिळणार नाही : एसटी महामंडळाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 01:02 AM2021-07-22T01:02:27+5:302021-07-22T01:03:02+5:30
Student ST passजिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या एसटी महामंडळाच्या धोरणांमुळे एसटीच्या पासेस विद्यार्थ्यांना अजून मिळालेल्या नाही. शाळांचे मुख्याध्यापक पत्र घेऊन डेपोत गेल्यानंतर डेपो प्रमुखांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय पासच मिळणार नाही, असे स्पष्ट सांगत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या एसटी महामंडळाच्या धोरणांमुळे एसटीच्या पासेस विद्यार्थ्यांना अजून मिळालेल्या नाही. शाळांचे मुख्याध्यापक पत्र घेऊन डेपोत गेल्यानंतर डेपो प्रमुखांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राशिवाय पासच मिळणार नाही, असे स्पष्ट सांगत आहे. विद्यार्थ्यांकडे प्रवासी व्यवस्था नसल्याने आठवडा लोटल्यानंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे.
जिल्ह्यात १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ च्या शाळा सुरू झाल्या. त्यासाठी शाळांना ग्रामपंचायतीकडून परवानगी घ्यावी लागली. ८ ते १२ च्या जिल्ह्यातील ७५४ शाळांपैकी पहिल्या दिवशी ९२ शाळा सुरू झाल्या १८३० विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित झाले. १९ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या ३ हजारावर पोहचली. ही संख्या अतिशय कमी आहे. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था तोकडी आहे. शाळा सुरू झाल्यापासून राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात बसेसची व्यवस्था करणे गरजेचे होते. अजूनही अनेक मार्गावरील बसेस सुरू झाल्या नाही. शाळांच्या मुख्याध्यापकांनी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात पत्रसुद्धा डेपोकडे पाठविले.
ज्या मार्गावर बसेस सुरू झाल्या, विद्यार्थी शाळेत यायला लागले, त्या विद्यार्थ्यांना पासची गरज भासू लागली आहे. पूर्वी मुख्याध्यापकाच्या पत्रावर विद्यार्थ्यांना पास दिल्या जायच्या. यंदा मात्र डेपो प्रमुखाकडून सांगण्यात आले की शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र असल्याशिवाय पासेस देऊ शकत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या या धोरणासंदर्भात शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. महामंडळाकडून पासेससाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र हवे, असे कुठलेही पत्र शिक्षण विभागाला मिळाले नाही. पासेस उपलब्ध नसल्यामुळे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होत आहे.
दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात ८ ते १२ वर्गाच्या एकूण शाळा - ७५४
जिल्ह्यात ८ ते १२ चे एकूण विद्यार्थी - १२२३४०
सोमवारपर्यंत सुरू झालेल्या शाळा - १४१
शाळेत उपस्थित झालेले विद्यार्थी - ३१७९
शाळेत उपस्थित शिक्षकांची संख्या - ७८१
- तालुक्याच्या ठिकाणी शाळा असल्यामुळे खेड्यापाड्यातून २० ते ३० किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थी शाळेत येतात. बसेसच्या फेऱ्या नसल्याने किंवा पास उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी जात आहे. मुळात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतांनाच महामंडळाने प्रवासी व्यवस्था सुरू करणे गरजेचे होते.
सुनील राऊत, शिक्षक