डम्पिंग यार्डसाठी पर्यायी जमिनीचा अभ्यास करा

By admin | Published: August 5, 2016 03:09 AM2016-08-05T03:09:06+5:302016-08-05T03:09:06+5:30

शहरातील लोकांचा कचरा ग्रामीण भागात आणून टाकण्याकरिता डम्पिंग यार्डसाठी सुपीक जमिनीची निवड का करण्यात आली

Study the alternative soil for the dumping yard | डम्पिंग यार्डसाठी पर्यायी जमिनीचा अभ्यास करा

डम्पिंग यार्डसाठी पर्यायी जमिनीचा अभ्यास करा

Next

मुख्यमंत्र्यांचे आदेश : मेट्रो रिजनच्या बैठकीत कृपाल तुमानेंनी लक्ष वेधले
नागपूर : शहरातील लोकांचा कचरा ग्रामीण भागात आणून टाकण्याकरिता डम्पिंग यार्डसाठी सुपीक जमिनीची निवड का करण्यात आली, असा आक्षेप रामटेकचे खासदार कृपालतुमाने यांनी मेट्रो रिजनच्या बैठकीत घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या मुद्याला दुजोरा दिला. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. डम्पिंग यार्डसाठी सध्या निवडलेल्या जमिनीचा अभ्यास करा. तसेच डम्पिंगसाठी पर्यायी जागा म्हणून जिल्ह्यात सभोवताल उपलब्ध असलेल्या खडक पहाड पडित जमिनी, दगड- मुरुम खाणी याचाही अभ्यास करून एक अहवाल तयार करा. पुढील बैठकीत या दोन्ही अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी नासुप्र अधिकाऱ्यांना दिले.

मेट्रो रिजन समितीची गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत खा. कृपाल तुमाने यांनी सांगितले की, कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धूरखेडा), तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे २५० एकर सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकण्यात आले आहे. याशिवाय मौदा तालुक्यातील तितूर येथील सुपीक जमिनीवरही असेच आरक्षण टाकण्यात आले आहे. डम्पिंग यार्डसाठी आरक्षित करण्यात आलेली बहुतांश जमीन काळी व सुपीक आहे. या जमिनीत शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, चणा, गहू, भाजीपाला अशी पिके घेतात. संत्रा व मोसंबीच्या बागाही आहेत. या जमिनीत पिकांसाठी आवश्यक घटकांचे प्रमाण भरपूर असून, भूगर्भात पाण्याचा मुबलक साठाही उपलब्ध आहे. असे असतानाही संबंधित जमिनीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता कार्यालयात बसून सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप तुमाने यांनी केला.
डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकल्यापासून येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता.जमिनी आरक्षित झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांची शेकडो कुटुंबे यामुळे उध्वस्त होणार आहेत. संबंधित ग्राम पंचायतींनी ठराव करून या आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले हे आरक्षण त्वरित रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात सभोवताल मोठ्या प्रमाणात दगड व मुरुमाच्या खाणी आहेत. या खाणी कित्येक फूट खोल गेल्या आहेत.
कचरा टाकण्यासाठी या खाणींचा वापर सुरू केला तरी पुढील कित्येक वर्षे या खाणी भरल्या जाणार नाहीत. या खाणींचा वापर डम्पिंगसाठी करण्यासाठी विनंती तुमाने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तुमाने यांनी सुचविलेल्या पर्यायाला समर्थन दिले. याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली. आरक्षित केलेल्या तसेच पर्यायी अशा दोन्ही जागांचे सर्वेक्षण व अभ्यास करून अहवाल तयार करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
बोरगाव येथील आंदोलकांचे प्रतिनिधी संजय पाटील ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आपण दिल्ली येथे जाऊन खा. तुमाने यांची भेट घेतली व शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. तुमाने यांनी लगेच दखल घेत संसदेचे अधिवेशन सोडून मुंबई गाठली.
मेट्रोरिजनच्या बैठकीत उपस्थित राहून शेतकऱ्यांची बाजू मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Study the alternative soil for the dumping yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.