नागपुरात हजारो विद्यार्थी करताहेत बाबासाहेबांच्या विचारांचे अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:35 AM2018-04-14T01:35:59+5:302018-04-14T01:36:43+5:30

महामानवाच्या विचारांना, व्यक्तिमत्त्वाला समजण्याची, अभ्यासण्याची इच्छा आज अनेकांच्या मनात येते. ही संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागा’ने उपलब्ध केली आहे.

Study of Babasaheb's thoughts in thousands of students in Nagpur | नागपुरात हजारो विद्यार्थी करताहेत बाबासाहेबांच्या विचारांचे अध्ययन

नागपुरात हजारो विद्यार्थी करताहेत बाबासाहेबांच्या विचारांचे अध्ययन

Next
ठळक मुद्दे‘डॉ. आंबेडकर थॉट’ विभागाचे योगदान : दरवर्षी हाउसफुल होतात जागा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण ही संज्ञा म्हणून गृहित धरली तर या संज्ञेला पर्याय ठरणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. धर्मशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र किंवा मानववंशशास्त्र आणि विज्ञान असा कोणताच विषय नाही जो बाबासाहेबांच्या कक्षेतून सुटला असेल. अमर्याद अध्ययनातून त्यांच्या विचारात आलेली परिपक्वता आणि मौलिकता कालसुसंगत ठरली आहे. देशातील कोणत्याही परिस्थितीत त्यांनी मांडलेले विचार प्रमाण मानावे व त्यानुसार वाटचाल करावी, एवढी परिणामकारकता त्यात आहे. म्हणूनच वर्णव्यवस्थेने शिक्षणच नाकारलेला हा महामानव आज मात्र अभ्यासाचा आणि स्वतंत्र अभ्यासक्रमाचा विषय ठरला आहे. या महामानवाच्या विचारांना, व्यक्तिमत्त्वाला समजण्याची, अभ्यासण्याची इच्छा आज अनेकांच्या मनात येते. ही संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागा’ने उपलब्ध केली आहे.
आंबेडकरी व दलित साहित्याच्या उदयामुळे बाबासाहेबांच्या विचारांना अभ्यासण्याकडे लोकांचा कल वाढत गेला व त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली. याच विचारातून रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते वा.को. गाणार यांनी नागपूर विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे १९८८ साली विद्यापीठातर्फे डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग सुरू करण्यात आला. त्यावेळी डॉ. उंदीरवाडे यांना विभागाचे पहिले मानद विभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. एखाद्या व्यक्तीच्या अभ्यासाकरिता सुरू झालेला हा देशातील पहिला विभाग होता, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. पुढे पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या विद्यापीठातही हा अभ्यासक्रम सुरू झाला. त्यावेळी विभागासाठी ४० विद्यार्थ्यांची संख्या निर्धारित करण्यात आली होती, जी आजही कायम आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या वर्षीपासून अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट प्रवेश न मिळाल्यामुळे अनेकांना निराश व्हावे लागते. विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची वानवा असताना हा विभाग मात्र दरवर्षी हाऊसफुल व्हावा, ही विशेष बाबच म्हणावी लागेल.
विद्यमान विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले, विभागाचे वाचनालय अद्ययावत आणि सुसज्जित असून डॉ. आंबेडकर यांचा विचार मांडणाºया १० हजार पुस्तकांनी समृद्ध आहे. वसंत मून यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व पुस्तके या विभागाला दान दिल्याने हे वाचनालय अधिकच समृद्ध झाले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला व अनेकांनी संशोधन पूर्ण केले आहे.
नोकरीपेशा, व्यावसायिकही विभागाचे विद्यार्थी
शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते. बाबासाहेबांनीही स्वत:ला आजीवन विद्यार्थीच मानले. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी येणारे विद्यार्र्थी या विचारांशी सुसंगत आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकिंग क्षेत्रातील नोकरीपेशा, व्यावसायिक, राजकारणी, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोक या विभागाचे विद्यार्थी आहेत. अनेकजण निवृत्तीनंतरही येथे प्रवेश घेतात. ज्यांना बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान माहिती करायचे आहे, सविस्तर अभ्यास करायचा आहे, असे कुणीही या विभागाचे विद्यार्थी असून यामध्ये सर्वधर्मीय, सर्वजातीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेबांचे सिद्धांत, तत्त्वज्ञानाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने विभागात केला जातो. त्यांच्या विचारांचे अध्ययन हे वर्तमान काळात महत्त्वपूर्ण झाले आहे. त्यामुळे दरवर्षी बाबासाहेबांना अभ्यासण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतच जात आहे. ही विद्यापीठ व आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- डॉ. प्रदीप आगलावे, विभागप्रमुख, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग

 

Web Title: Study of Babasaheb's thoughts in thousands of students in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.