अध्ययन केंद्राची वीज कापली, विद्यार्थी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:03+5:302021-08-19T04:10:03+5:30
नागपूर : विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने नागपूर सुधाार प्रन्यासच्या जागेवर सुरू झालेल्या छत्रपती शाहू महाराज अध्ययन केंद्राची वीज कापण्यात आली. ...
नागपूर : विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने नागपूर सुधाार प्रन्यासच्या जागेवर सुरू झालेल्या छत्रपती शाहू महाराज अध्ययन केंद्राची वीज कापण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी संकटात आले आहेत. येथे अधिकृत वीज कनेक्शन नसल्याची बाबही या कारवाईदरम्यान निदर्शनास आली. महावितरणने वीजचोरीचे प्रकरण दाखल करीत दंड ठोठावला आहे. येथील विद्यार्थ्यांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट वीज देण्याची मागणी केली आहे.
येथील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी पोलीस ठाण्याजवळ एम्प्रेस मिल कॉलनीत नासुप्रची खाली पडलेली जागा होती. या जागेवर अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले. परिसरातील गरजू विद्यार्थी येथे येऊन अभ्यास करायचे. ही जागा नासुप्रची असल्याने येथील वीज मीटर अनधिकृत असेल याची कल्पना या विद्यार्थ्यांना नव्हती. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला या विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की, लवकरच रेल्वे, बँक, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षा होणार आहे. वीज नसल्याने अभ्यास करणे कठीण होईल. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा.
येथील शासकीय जागेवरून अवैधपणे वीज घेतली जात आहे, याची माहिती शासकीय एजन्सीला इतक्या वर्षांपासून का झाली नाही, असा प्रश्नही या कारवाईतून निर्माण झाला आहे.