चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

By सुमेध वाघमार | Published: July 12, 2024 10:33 PM2024-07-12T22:33:24+5:302024-07-12T22:33:51+5:30

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले...

Study of patients in four years: Oral cancer ranked first in Nagpur followed by breast cancer | चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग

चार वर्षातील रुग्णांचा अभ्यास : नागपुरात पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग तर दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग


नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने २०१९ ते २२ या कालावधीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यात नागपुरात कर्करोगांमध्ये पहिल्या क्रमांकावर तोंडाचा कर्करोग, दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा तर तिसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे आढळून आले. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

हॉस्पिटलचे संचालक व रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. करतार सिंग यांनी सांगितले, हॉस्पिटलमध्ये २०१९ ते २२ या कालावधीत १९,३०४ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ५८ म्हणजे ११,१९३ रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोगाच्या प्रकारानुसार त्याचे वर्गीकरण आणि अभ्यास केल्यानंतर, तोंडाचा कर्करोगाचे सर्वाधिक ३२ टक्के म्हणजे ३,५४१ रुग्ण आढळून आले. स्तनाचा कर्करोगाचे १४ टक्के म्हणजेच १,५७९ रुग्ण, तर गर्भाशयाच्या कर्करोगाचे ५५५  रुग्ण आढळले.

-५१ ते ६० वयोगटात सर्वाधिक रुग्ण
कर्करोगाचा या रुग्णांमध्ये ५१ ते ६० वयोगटातील सर्वाधिक २६ टक्के रुग्ण होते. या शिवाय, ४१ ते ५० वयोगटात १.७ टक्के, ६१ ते ७० वयोगटात १९ टक्के रुग्ण होते.

-लक्षणे दिसताच उपचार आवश्यक
रुग्णालयाचे सल्लागार डॉ. बी. के. शर्मा म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारा तोंडाचा कर्करोग भयानक रुप घेत आहे. अनेक रुग्ण तिसऱ्या व चवथ्या टप्प्यात येतात. त्यामुळे जीवाचा धोका वाढतो आहे. मात्र लक्षणे दिसताच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये  कर्करोगाची प्रगती आणि त्याचे धोकादायक परिणाम टाळता येणे शक्य आहे.

-२०२५ मध्ये कर्करोगाचे १५.७ लाख रुग्ण
२०२२ मध्ये १४.६ लाख कर्करोगाचे रुग्ण होते २०२५ मध्ये ही संख्या वाढून १५.७ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यात स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोगाचे प्रमाण अधिक राहणार आहे.

-जगात कर्करोगात भारताचा क्रमांक तिसरा
कर्करोगाच्याबाबतीत अमेरिका आणि चीननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, बिहार आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. २०२२ मध्ये, उत्तर प्रदेशात २.११ लाख, महाराष्ट्रात १.२१ लाख, बंगालमध्ये १.१३ लाख, बिहारमध्ये १.१० लाख आणि तामिळनाडूमध्ये ८५ हजार प्रकरणे नोंदवली गेली.

-१० पैकी एक पुरुषाचा कर्करोगाने मृत्यू
जागतिक आकडेवारीच्या आधारे कर्करोगामुळे १० पैकी एक पुरुष आणि १२ पैकी एक महिलेचा मृत्यू होतो. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) फुफ्फुस आणि स्तनाचा कर्करोग हे जगातील सर्वात सामान्य कर्करोग म्हणून वर्णन केले आहे. त्यामुळे परवडणारे कर्करोग उपचार, स्वस्त औषधे आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

 

Web Title: Study of patients in four years: Oral cancer ranked first in Nagpur followed by breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.