उपराजधानीत पाणीटंचाई

By admin | Published: February 26, 2015 02:14 AM2015-02-26T02:14:05+5:302015-02-26T02:14:05+5:30

पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे.

Sub-soil water shortage | उपराजधानीत पाणीटंचाई

उपराजधानीत पाणीटंचाई

Next

नागपूर : पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच दुरुस्तीसाठी ७२ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शहरातील पश्चिम व दक्षिण भागाला तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. मोजकेच पाणी मिळणार असल्याने लोकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा वाकी परिसरातील गोसेवाडी येथे फुटला आहे. कालव्यातून ५७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या कालव्याव्दारे नागपूर शहरासोबतच खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो.
बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कालव्याला छिद्र पडले. शेतकऱ्यांनी याची माहिती पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. दुपारी १२ वाजता पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु २३ कि.मी. अंतर पार करण्याला बराच कालावधी लागला. त्याुमळे दुपारी ३ च्या सुमारास कालव्याला मोठे भगदाड पडले. यात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी तामसवाडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. पेंच कालव्याची अवस्था दयनीय आहे. पेंच टप्पा -४ च काम मागील सहा वर्षापासून सुरु आहे. ३१ मार्च २०१२ पर्यत काम पूर्ण होऊ न पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. ते निर्धारित कालावधीत न झाल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुुरुस्तीला वेळ मिळाला नसल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
तीन दिवस बसणार फटका
कालवा फुटल्याने पेंच प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला दुपारनंतर कालव्यात महादुला पंपिंग स्टेशनमधून गोरेवाडा तलावात पंप करण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. या तलावाची सध्याची पातळी ३१५ मीटर इतकी आहे. पुढील ३ दिवसात ती ११४ .३ इतकी घटण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम पेंच प्रकल्पातील शुद्धीकरण केंद्रावर होणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १ मार्चला सकाळपर्यत पश्चिम व दक्षिण नागपुरातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.
शेती व पिकाचे नुकसान
इतक्या मोठ्या प्रमाणात कालवा फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. पाण्याच्या प्रवाहात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीसोबतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याजवळील शेती खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Sub-soil water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.