उपराजधानीत सोने विक्री वाढली
By admin | Published: October 27, 2014 12:31 AM2014-10-27T00:31:19+5:302014-10-27T00:31:19+5:30
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये
नागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. यंदा सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण होते. सुरक्षित आणि घसघशीत रिटर्न्स मिळत असल्याने सोने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे सराफांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपुजनापर्यंत नेमकी किती उलाढाल झाली याबाबत सराफ अधिकृतपणे माहिती देत नसले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा खरेदीला प्रचंड उत्साह दिसून आला. यंदा सोन्याच्या नाण्यांना विशेष मागणी होती. सोनेखरेदी हा गुंतवणुकीचाही सुरक्षित पर्याय असल्याने ग्राहक या मौल्यवान दागिन्याची खरेदी करत असल्याचे सराफांनी सांगितले.
तयार फराळाकडे कल
यंदाच्या दिवाळीत तयार फराळ घेण्याकडे गृहिणींचा कल दिसून आला. याशिवाय अनेक महिला मंडळांनी फराळ तयार करून विक्रीवर भर दिला. तयार फराळ विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. दिवाळीसाठी लागणारी करंजी ३०० रुपये किलो, शंकरपाळे २४० रुपये, चकल्या २६० रुपये, लाडू १५० रुपये, शेव २०० आणि चिवडा २२५ रुपये किलो दराने विकला गेला.
ड्रायफ्रूटला सर्वाधिक पसंती
गेल्या काही वर्षांपासून मिठाईच्या तुलनेत भेटस्वरुपात देण्यासाठी ड्रायफ्रूटला मागणी वाढत आहे.
विविध दुकानांमध्ये १०० ग्रॅमपासून १ किलोपर्यंत ड्रायफ्रूटचे आकर्षक बॉक्स होते. यंदा काश्मीरमधील पूरस्थिती आणि हवामान बदलामुळे उत्पादन घटले. त्यामुळे आक्रोड मगजचे भाव दुपटीपेक्षा जास्त वाढले. सरासरी १८०० ते २२५० रुपये किलोपर्यंत आक्रोडची विक्री झाली. याशिवाय किसमिस, काजू, बादाम आदींचेही भाव वाढले होते.
फूड इंडस्ट्रीत तेजी
सणासुदीच्या दिवसांचा सर्वात जास्त फायदा होतोय तो फास्ट फूड इंडस्ट्रीला. दिवाळीच्या दिवसात सगळीकडेच ताव मारला जातोय तो खाण्यापिण्याच्या पदार्थांवर. म्हणूनच दिवाळीनिमित्त फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी चविष्ठ पॅकबंद पक्वाने बाजारात आणली. ग्राहकांकडूनही तितकाच प्रतिसाद मिळाला. काही कंपन्यांनी पक्वान्नांचे पॅक आणून गृहिणींना दिलासा दिला. नागपुरात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॅकबंद मिठाईची कोट्यवधींची उलाढाल झाल्या.(प्रतिनिधी)