उपराजधानीत डान्स बार नकोच

By admin | Published: March 19, 2016 02:38 AM2016-03-19T02:38:43+5:302016-03-19T02:38:43+5:30

नागपुरातही काही डान्स बार मालकांनी आता परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जांवर विचारही केला जाईल

Subjective dance bar unwanted | उपराजधानीत डान्स बार नकोच

उपराजधानीत डान्स बार नकोच

Next

नागपूर : नागपुरातही काही डान्स बार मालकांनी आता परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जांवर विचारही केला जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना परवानेही देण्यात येतील. न्यायालयाच्या निर्णयासमोर आपण हतबल असल्याचे राज्य शासन दाखविते आहे. पण नागपुरात डान्स बारचा सुळसुळाट झाला तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल आणि या शहराची शांतता भंग पावेल, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे. नागपुरात डान्स बारची गरजच नसल्याची प्रतिक्रिया शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
नागपूर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. त्यांनी डान्स बारच्या विरोधात भूमिका घेतल्याचेही स्पष्ट आहे. पण उच्च न्यायालयाचा आदेश म्हणून राज्य शासनानेही डान्स बार बंदीकडे कानाडोळा केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर डान्स बारला परवानगी मिळण्याचे मार्ग खुले झाले आहे. पण राज्य शासन ठोस कायदा करून डान्स बारवर बंदी कायम ठेऊ शकते. समाजाला विघातक ठरणाऱ्या बाबी समाजात प्रस्थापितच होऊ न देणे, हा एक सामाजिक संकेत आहे. नागपुरातच नव्हे तर इतरत्रही दारु दुकाने आहेत आणि बारही आहेत. फार अतिरेक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलने केली कारण या बारमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावर त्याच्या झळा महिलांनीच सोसल्या आहेत. केवळ व्यावसायिक कारणे आणि राज्य शासनाचा महसूल एवढ्यापुरताच हा विषय नाही. महिलांच्या आंदोलन आणि आक्र ोशानंतर अखेर प्रशासनाला मतदान घ्यावे लागले आणि अनेक भागातील बार आणि दारू दुकाने बंद करावी लागली. त्याप्रमाणेच डान्स बारही समाजाला घातक ठरणार आहेत. नागपूरच्या शांत वातावरणाचा भंग होईल, गुन्हेगारी वाढेल, वेश्यावृत्ती वाढेल आणि त्यातून होणारे ‘ट्रॅफिकिंग’ समाजाला रसातळाला नेणारे असू शकते. यासाठी शासनानेच सामायिक, वैचारिक भूमिका घेणे गरजेचे आहे. डान्सबार प्रस्थापित झाल्यावर ते बंद करणे सोपे नाही. डान्स बार नैतिक मूल्यांनी चालविले जात नाहीत. याबाबत कुठल्याच राजकीय पक्षाने ठोस भूमिका घेतलेली नाही. याबाबतही विचारवंतांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

अनैतिकतेला खतपाणी घालण्याचा प्रकार
डान्सबार ही संस्कृती सर्वांनाच परिचित आहे. समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या डान्सबारवर त्यामुळे बंदी घालण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अनैतिकतेला खतपाणी घालणारा आहे.
उमेशबाबू चौबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
पोलीस आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची राहील
न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे प्रशासनाला त्याला परवाना द्यावा लागेल. परंतु बार चालकांनीसुद्धा न्यायालयाच्या निर्देशानुसारच बार चालविला पाहिजे. आज शहरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाने अंकुश मिळविला आहे. डान्सबारमुळे पुन्हा गुन्हेगारी फोफावू नये यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
प्रवीण दटके, महापौर
अश्लीलता पसरविण्याचा प्रकार
डान्सबारला परवानगी देण्याचा प्रकार हा अश्लीलता पसरविण्याचाच प्रकार आहे. शहराची संस्कृती,सभ्यता आणखी लयास गेल्याशिवाय राहणार नाही. महिलांवरील अत्याचार, शोषणाच्या घटना समाजात दररोज घडत आहेत. पुरुषांची मानसिकता महिलांच्या बाबतीत अतिशय वाईट आहे. या डान्सबारसारख्या प्रकाराला चालना दिल्यास, त्याचे समाजात विशेष म्हणजे महिलांवर वाईट परिणाम होणार आहे.
निशा सावरकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद
न्यायालयाच्या निर्णयापुढे शासन काही करू शकत नाही
राज्य शासनाने डान्स बारबद्दलचा योग्य निर्णय घेतला होता. पण त्यावर उच्च न्यायालयाने आक्षेप घेत डान्स बारला परवानगी देण्याचा आदेश दिला. शासनाने डान्स बार बंदीबाबत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयापुढे शासन काहीही करू शकत नाही. नागपूरबद्दल बोलायचे झाले तर नागपुरात डान्स बार सुरू व्हायला नकोत, असे मला व्यक्तीश: वाटते.
गिरीश गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
शहराचा सांस्कृतिक चेहरा बिघडेल
डान्सबारला विरोधच करायला हवा. हाच प्रकार २००५ साली घडला होता. त्यावेळीही ४ डान्स बारला परवानगी देण्यात आली तेव्हा माहेर संस्थेच्यावतीने आम्ही आंदोलन केले होते. पण काही डान्स बार मालकांनी सांस्कृतिकतेच्या नावाखाली पळवाट शोधली होती. पण हे योग्य नाही. शासनाला महसूल मिळत असला तरी नागरिकांची घरे बरबाद होतात असा महसूल काय कामाचा. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने विचार करण्याची गरज आहे. डान्स बार सुरू झालेत तर शहराचा सांस्कृतिक चेहरा बिघडेल.
- अरुणा सबाने, सामाजिक कार्यकर्त्या

नागपूर हे शांततेचा, समतेचा संदेश देणारे शहर
नागपूर शहर शांत आहे. पण गेल्या काही वर्षात नागपुरात बलात्कार आणि गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यात डान्स बारला परवानगी दिली तर मद्यपान करणाऱ्यांची उन्मादकता वाढेल. या शहरात शांततेचा संदेश देणारे दीक्षाभूमी हे केंद्र आहे. रा. स्व. संघाचे मुख्यालय आहे. नागपूरची एक संस्कृती आहे आणि या शहराचा एक सांस्कृतिक चेहरा आहे. डान्सबारमुळे हा सांस्कृतिक चेहरा दूषित होईल आणि या शहराचे वातावरण बिघडेल. अश्लीलता, दरोडे, गुन्हेगारी आणि महिलांच्या छेडखानीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आणि धोका व्यक्त करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली डान्स बारवाले पळवाट काढतात पण नैतिकतेने हे डान्स बार चालविले जात नाही. सांस्कृतिकतेच्या नावाखाली अशा ठिकाणी काय चालते, ते सांगण्याची गरज नाही. डान्स बार हे वेश्यावृत्तीच्या लोकांचे अड्डे, काळ्या पैशाचे व्यवहार करण्याचे केंद्र होते, हा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे नागपूरचे सांस्कृतिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी किमान नागपूर शहरात डान्स बारला परवानगीच देऊ नये. नागपुरात डान्स बारची गरजही नाही. मुळात डान्स बारच्या गरजेची जी कारणे सांगितली जातात त्यासाठी नागपूर योग्य ठरत नाही. येथे जागतिक स्तरावर व्यवहार करणारे उद्योग नाही, विदेशातील पाहुण्यांचे मोठ्या प्रमाणात आवागमन नाही. त्यामुळे शासनाने नागपुरात डान्स बारला परवानगीच देऊ नये, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे आहेत. दोन वजनदार व्यक्ती नागपुरात असताना डान्स बारसारख्या विषयाला नागपुरात बंदी असावी. नागपुरात डान्स बारच्या निमित्ताने वाढणारी संभाव्य गुन्हेगारी मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यासाठीही त्यांच्या शहराची ओळख पुसणारी असू शकते. ही बाब या दोघांसाठीही लज्जास्पद ठरू शकते. त्यामुळे नागपुरात डान्स बार नकोच, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

डान्स बार ही आपली संस्कृती नाहीच
डान्स बार मुळे आपली संस्कृती बिघडते कारण ती आपली संस्कृती नाहीच. डान्स बार हा एक व्यवसाय झाला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली हे बार चालतात. त्यात बाकी काय-काय चालणार ते आपल्याला सांगता येत नाही. पण नागपुरात डान्स बार सुरु व्हायला नकोत. याचा निर्णय शासनाने घ्यायचा आहे. डान्सबारमुळे युवकांवर वाईट परिणाम होतील, हे सांगण्यासाठी कुण्या विचारवंतांची गरज नाही.
इ. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी
उन्मादकता वाढेल
अनेक लोक डान्स बारवाल्यांची बाजू घेतात. हा त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे आणि यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, असेही कारण सांगितले जाते. पण या बारमध्ये जाणाऱ्या लोकांच्या कुटुंबांची वाताहत होते. त्यांच्या गृहिणींची फरफट होते, हे या लोकांना का दिसत नाही. यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. या कुटुंबाचा विचार कोण करणार. डान्स बारमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराचे पर्याय शासनाला शोधता येतात. डान्स बार हे काळ्या पैशांचे व्यवहार करण्याचे, वेश्यांचे केंद्र होतात.
माधुरी साकुळकर, सामाजिक कार्यकर्त्या
पोलिसांच्या कमाईचा स्रोत ठरू नये
परवाना न देणे हा न्यायालयाचा अवमान आहे. परंतु न्यायालयाने हा निर्णय देताना काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. त्याचेही पालन होणे आवश्यक आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे. शहरात अवैध व्यवसाय वाढण्याला एकमेव कारण पोलीस प्रशासन आहे. हे डान्सबार सुद्धा पोलिसांच्या कमाईचा स्रोत ठरू नये. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ज्या बार मालकांनी परवान्यासाठी अर्ज केले त्यांची मानसिकता महिलांच्या बाबतीत अतिशय दूषित असल्याचे दिसून येते.
आभा पांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष, नागपूर महापालिका
नागपूरवर धोक्याचे सावट
डान्सबार बंद करून त्यात काम करणाऱ्या मुलींचा रोजगार बुडाला, अशी ओरड होत आहे. परंतु या मुली स्थानिक नाहीत. बाहेरच्या राज्यातून या मुली आणून नाचविल्या जातात. त्यामुळे डान्सबार बंद केल्याने महाराष्ट्रातील मुलींचा रोजगार बुडाला नाही. शासनसुद्धा आपली बाजू न्यायालयात मांडताना अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागला. डान्सबारवर बंदी येण्यापूर्वी या डान्सबारने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तरुण मुले गुन्हेगारीकडे वळली आहे.
प्रगती पाटील, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

नागपूर हे शांततेचा, समतेचा संदेश देणारे शहर
नागपूर शहर शांत आहे. पण गेल्या काही वर्षात नागपुरात बलात्कार आणि गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यात डान्स बारला परवानगी दिली तर मद्यपान करणाऱ्यांची उन्मादकता वाढेल. या शहरात शांततेचा संदेश देणारे दीक्षाभूमी हे केंद्र आहे. रा. स्व. संघाचे मुख्यालय आहे. नागपूरची एक संस्कृती आहे आणि या शहराचा एक सांस्कृतिक चेहरा आहे. डान्सबारमुळे हा सांस्कृतिक चेहरा दूषित होईल आणि या शहराचे वातावरण बिघडेल. अश्लीलता, दरोडे, गुन्हेगारी आणि महिलांच्या छेडखानीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आणि धोका व्यक्त करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली डान्स बारवाले पळवाट काढतात पण नैतिकतेने हे डान्स बार चालविले जात नाही. सांस्कृतिकतेच्या नावाखाली अशा ठिकाणी काय चालते, ते सांगण्याची गरज नाही. डान्स बार हे वेश्यावृत्तीच्या लोकांचे अड्डे, काळ्या पैशाचे व्यवहार करण्याचे केंद्र होते, हा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे नागपूरचे सांस्कृतिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी किमान नागपूर शहरात डान्स बारला परवानगीच देऊ नये. नागपुरात डान्स बारची गरजही नाही. मुळात डान्स बारच्या गरजेची जी कारणे सांगितली जातात त्यासाठी नागपूर योग्य ठरत नाही. येथे जागतिक स्तरावर व्यवहार करणारे उद्योग नाही, विदेशातील पाहुण्यांचे मोठ्या प्रमाणात आवागमन नाही. त्यामुळे शासनाने नागपुरात डान्स बारला परवानगीच देऊ नये, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे आहेत. दोन वजनदार व्यक्ती नागपुरात असताना डान्स बारसारख्या विषयाला नागपुरात बंदी असावी. नागपुरात डान्स बारच्या निमित्ताने वाढणारी संभाव्य गुन्हेगारी मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्यासाठीही त्यांच्या शहराची ओळख पुसणारी असू शकते. ही बाब या दोघांसाठीही लज्जास्पद ठरू शकते. त्यामुळे नागपुरात डान्स बार नकोच, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Subjective dance bar unwanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.