कोविड संदर्भात माहिती तीन दिवसात सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:16 PM2020-05-27T21:16:47+5:302020-05-27T21:19:20+5:30
कोविड-१९ संदर्भात आवश्यक उपाययोजना व विलगीकरण केंद्राची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मनपाला किती निधी मिळाला, तसेच विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करून कोविड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश बुधवारी महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ संदर्भात आवश्यक उपाययोजना व विलगीकरण केंद्राची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मनपाला किती निधी मिळाला, तसेच विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर करून कोविड संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश बुधवारी महापौरसंदीप जोशी यांनी प्रशासनाला दिले. बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
शहरातील कोविड-१९ संदर्भात सद्यस्थिती, व त्यावरील उपाययोजना , विलगीकरण कक्षामधील व्यवस्था आदीचा महापौरांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर,आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.
विलगीकरण कक्षामध्ये गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवकांकडे केल्या जातात. त्यामुळे मनपाच्या सर्व विलगीकरण कक्षाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांक याची यादी तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश यावेळी जोशी यांनी दिले.
पाणी समस्येकरिता झोननिहाय बैठकी घ्या
उन्हाची दाहकता वाढत असतानाच नागरिकांना पाणी समस्येचाही सामना करावा लागत आहे. अनेक भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरातील अनेक भागात ही समस्या आहे. त्यामुळे याबाबत योग्य कारवाई व्हावी याकरिता जलप्रदाय समिती सभापतींच्या अध्यक्षतेत प्रत्येक झोनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी. तसेच या बैठकीचा अहवाल तयार करून तो सादर करा, असे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.