आंतरजिल्हा बदली धोरणाचा फेरप्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:00 AM2019-02-15T00:00:26+5:302019-02-15T00:02:49+5:30
नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नियुक्तीबाबत विधी विभागाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीबाबत समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करा, त्यांनी सुचविलेल्या सूचनांसह आंतरजिल्हा बदली धारेणाचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित विधी समितीची बैठकीत मेश्राम बोलत होते. उपसभापती संगीता गिऱ्हे, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, अमर बागडे, जयश्री वाडीभस्मे, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज पारोचे, आनंद शेंडे, अजय माटे उपस्थित होते.
आंतर महानगरपालिका, नगर परिषद, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बदलीकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमान्वये महाराष्ट्र शासनाच्या निर्गमित केलेल्या निर्देशानुसार मनपाच्या विधी विभागामार्फत कर्मचाºयांच्या आंतरजिल्हा बदलीद्वारे नियुक्तीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. या बदली धोरणासंदर्भात धोरण व नियमांची प्रत सर्व सदस्यांना वितरीत करून त्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह फेरप्रस्तावित करण्याचेही निर्देश मेश्राम यांनी दिले.
मनपात कार्यरत ऐवजदारांची सेवाज्येष्ठतेची झोननिहाय यादी उपलब्ध आहे. मात्र या ऐवजदारांची केंद्रीकृत सेवाज्येष्ठता यादी तयार करून ती तात्काळ सादर करा. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरिता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. विधी अधिकारी पद उपायुक्त पदाकरीता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला तपशीलवार माहितीसह प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले.
मनपाच्या जागांवर दारू विक्री नाही
महापालिकेच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये दारूचा व्यवसाय चालत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व असामाजिक तत्त्वाच्या कार्यवाहीवर आळा घालता यावा यासाठी मनपाच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमधील दारू व्यवसायांवर बंदी लादण्याची शिफारस विशेष आमंत्रित व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली. मनपाच्या जागांवर यापुढे दारू विक्री होऊ नये यासाठी या दुकानांवर तातडीने बंदीची कार्यवाही करा, असे निर्देश मेश्राम यांनी दिले.