सहा राज्यातील पोलिसांच्या रडारवर सुबोधसिंग

By admin | Published: October 5, 2016 02:56 AM2016-10-05T02:56:06+5:302016-10-05T02:56:06+5:30

उपराजधानीतून भरदिवसा नऊ कोटींचे सोने लुटून नेणारा सुबोधसिंग याला हुडकून काढण्यासाठी महाराष्ट्रासह पाच ते सहा राज्यातील पोलीस यंत्रणा कामी लागली आहे.

Subodh Singh on the radars of six states | सहा राज्यातील पोलिसांच्या रडारवर सुबोधसिंग

सहा राज्यातील पोलिसांच्या रडारवर सुबोधसिंग

Next

मणप्पुरम गोल्ड फायनान्स दरोड्याचा तपास : सुबोधचा खासमखास ताब्यात ?
नरेश डोंगरे  नागपूर
उपराजधानीतून भरदिवसा नऊ कोटींचे सोने लुटून नेणारा सुबोधसिंग याला हुडकून काढण्यासाठी महाराष्ट्रासह पाच ते सहा राज्यातील पोलीस यंत्रणा कामी लागली आहे. मात्र सुबोधसिंग स्वत:सोबतच त्याच्या टोळीतील साथीदारांना घेऊन गायब झाला आहे. दरम्यान, तब्बल पाच दिवसानंतर पोलिसांनी सुबोधसिंगच्या एका खासमखास मित्राला ताब्यात घेतले आहे. मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर २८ सप्टेंबरला सशस्त्र दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा घालून ३१ किलो सोेने आणि ३ लाखांची रोकड लुटून नेली. नागपूरच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा घालणारी ही टोळी कुणाची त्याची माहिती पोलिसांना छत्तीसगड पोलिसांकडून काही तासातच मिळाली. अनेक राज्यातील पोलिसांची झोप उडविणाऱ्या सुबोधसिंग याने आपल्या टोळीतील साथीदारांच्या मदतीने हा दरोडा घातल्याचे स्पष्ट झाले.

बँका लुटणारा सराईत दरोडेखोर

नागपूर : कुख्यात सुबोधसिंग बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील चिस्तीपूर येथील रहिवासी आहे. जेमतेम शिक्षण झालेला सुबोधसिंग वयाच्या १६ ते १७ व्या वर्षांपासूनच गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे सांगितले जाते. त्याच्या टोळीत १० ते १५ गुन्हेगारांचा समावेश असून, विविध राज्यातील गुन्हेगारांशी त्याची मैत्री आहे. छत्तीसगडमधील संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात रोकड मिळत असल्याने तो बँकेतच हात मारतो. त्याने यापूर्वी बिहार, केरळ, ओडिशा, कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक राज्यात बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये लुटमार केलेली आहे. सहा वर्षांपुर्वी अशाचप्रकारे बँक लुटण्याच्या तयारीत असलेल्या सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांची केरळ पोलिसांसोबत चकमक झाली होती. त्यावेळी त्याचे चार साथीदार गोळीबारात जखमी झाले होते, अशीही सूत्रांची माहिती आहे. या घटनेनंतर विविध प्रांतातील पोलीस आणि गुन्हेगारी वर्तुळात बँका लुटणारा सराईत दरोडेखोर म्हणून कुख्यात सुबोधसिंगचे नाव विविध राज्यातील पोलीस यंत्रणांच्या रेकॉर्डवर नोंदले गेले.
महाराष्ट्रात त्याने यापूर्वी कुठे गुन्हे केले ते तूर्त पुढे आले नाही. मात्र, राज्याच्या उपराजधानीत धाडसी दरोडा घालून सुबोधसिंग आणि त्याच्या टोळीने नागपूरच नव्हे तर राज्याच्या पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याचा छडा लावण्यासाठी नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणची पोलीस पथके रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. राज्याची तपास यंत्रणाच नव्हे तर, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशची तपास यंत्रणाही कुख्यात सुबोधसिंग आणि साथीदारांचा शोध घेत आहेत.
कुख्यात सुबोधसिंगचे जबलपूर, रायपूरमध्ये मोठे गुन्हेगारी नेटवर्क आहे. त्याचे नातेवाईक अन् गावातील साथीदारही पोलिसांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी संशयास्पद चुप्पी साधली आहे. गावात पोहचलेल्या पोलिसांना भलत्याच अडचणींचा सामना करावा लागला होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याचे नातेवाईक तसेच संपर्कातील काही जण लपवाछपवी करीत आहेत. रायपूरमधील त्याचा ‘खासमखास भाई’असाच दिशाभूल करणारी आणि संशयास्पद माहिती देत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समजते. नातेवाईकांच्या माध्यमातून सुबोधसिंगवर दडपण आणण्याचे तपास यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)

गावाजवळून पळाला
सूत्रांच्या माहितीनुसार, येथे दरोडा घातल्यानंतर तो नालंदा जिल्ह्यातील आपल्या मूळगावाकडे निघाला. परंतु नागपूर पोलिसांना आपला सुगावा लागल्याचे कळताच त्याने घरी जाण्याचे टाळून गावाजवळून पळ काढला. त्यामुळे त्याला हुडकून काढण्यासाठी पोलीस अन् त्यांचे खबरेच नव्हे तर अनेक ठिकाणचे गुन्हेगार, त्यांचे हस्तकही कामी लागल्याची माहिती आहे. तो देशातील कोणत्या प्रांतात दडून बसला, त्याचा शोध घेतानाच तो बिहारच्या सीमेवरून नेपाळमध्ये पळून गेला काय, त्याचीही माहिती काढली जात आहे. कुख्यात सुबोधसिंग तासन्तास व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करतो, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, सद्यस्थितीत त्याने आपला मोबाईल बंद ठेवल्याने त्याचे स्टेटस्, लोकेशन तपासणे कठीण झाले आहे.

 

Web Title: Subodh Singh on the radars of six states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.