सुबोध मोहितेंचा काँग्रेसला रामराम
By admin | Published: May 30, 2017 02:36 AM2017-05-30T02:36:20+5:302017-05-30T02:36:20+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सोमवारी शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश घेतला.
मेटेंच्या शिवसंग्राममध्ये प्रवेश : तिसरी राजकीय इनिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सोमवारी शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश घेतला. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मोहिते यांनी समर्थकांसह तिसऱ्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. यापूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मोहिते यांनी काँग्रेसशी मोट बांधली होती.
मात्र जिल्हा काँग्रेसमध्ये होत असलेली कोंडी आणि शिवसेनेची गाडी सुटल्यानंतर मोहिते यांनी मेटेंचा हात पकडला. भारतीय संग्राम परिषद राज्यातील भाजपासोबत सत्तेत आहे.
सुबोध मोहिते तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सचिव होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांच्यावर नागपूर जिल्हा ग्रामीणच्या प्रमुखाची जबाबदारी सोपविली. त्यानंतरच्या १९९९ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यांना रामटेकमधून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर तेव्हा काँग्रेसचे बलाढ्य नेते बनवारीलाल पुरोहित होते. त्यावेळी त्यांनी पुरोहितांचा आश्चर्यकारकपणे पराभव केला. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार होते.
२००३ मध्ये सुबोध मोहिते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. २००४ मध्ये शिवसेनेने त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा रामटेकमधून उमेदवारी दिली.
तेव्हा काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. श्रीकांत जिचकार होते. ही निवडणूक मोहितेंसाठी अतिशय कठीण जाईल, असे मानले जात होते. परंतु याही वेळी मोहितेंनी बाजी मारली. लोकसभेतील त्यांची कामगिरी सरस होती. बेस्ट पार्लमेंट अवॉर्डने त्यांना सन्मानितही करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे मोहितेंवर प्रेम होते. पण २००७ मध्ये एकेदिवशी मोहिते यांनी अचानकपणे खासदारकीचा आणि शिवसेनेचाही राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना केंद्रीय मंत्री पदाची आॅफर दिली होती. रामटेकमध्ये पोटनिवडणूक झाली. शिवसेनने प्रकाश जाधव यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे रणजित देशमुख यांनी बंडखोरी केली. देशमुख यांच्या बंडखोरीमुळे मोहितेंना फटका बसला. जाधव यांनी मोहितेंचा पराभव केला. त्यानंतर मोहितेंचे राजकीय करिअर डळमळायला लागले. ज्या हेतूने त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो हेतू होता पद. पक्षाकडून त्यांना संधी दिली जात होती, पण ती पदे त्यांना प्राप्त करता आली नाही. काँग्रेसने त्यांना दोनदा विधानसभेची उमेदवारी दिली. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. नंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ केली. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्यांचे विमान वेळेवर उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे ते वेळेत अर्जच भरू शकले नाही. परिणामी त्यांची संधी हुकली. काँग्रेसने त्यांना पक्ष प्रवक्तेपद दिले. पण मोहिते आपला ठसा उमटू शकले नाहीत. तसेच नेते म्हणून काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना कधी स्वीकारले नाही. सध्या ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते.
काँग्रेस नेते म्हणून आक्रमकता त्यांच्यात कधी दिसली नाही. पदांच्या आणि संधीच्या शोधातच मोहिते काँग्रेसमध्ये वावरत असल्याचे जाणवत होते. मध्यंतरीच्या काळात ते शिवसेनेत परत जात असल्याची चर्चा होती. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्याही वावड्या उठत होत्या. शेवटी आज दुपारी मुंबईत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. सुबोध मोहिते यांनी अशारीतीने आणखी एका पक्षात प्रवेश केला असून या पक्षात तरी ते किती दिवस राहतात, असा प्रश्न निर्माण झाला असला तरी ते येणारा काळच ठरवेल.