दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान; राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:27 AM2023-12-21T07:27:06+5:302023-12-21T07:27:13+5:30
दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी, बटरचे दर यावर अवलंबून असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
दूध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी, बटरचे दर यावर अवलंबून असतात. दूध उत्पादकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार आहे.
यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता, याकडे मंत्री विखे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
अशा असतील अटी व शर्थी
योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान २९ रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.
डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.