आयकर संग्रहणात प्रत्यक्ष करांचा भरीव वाटा

By admin | Published: July 6, 2016 03:15 AM2016-07-06T03:15:22+5:302016-07-06T03:15:22+5:30

आयकर विभागातील संगणकीकरण व कार्यशीलतेमुळे आयकर विभागाचे काम सुलभ झाले आहे.

The substantial share of direct taxes in the income tax collection | आयकर संग्रहणात प्रत्यक्ष करांचा भरीव वाटा

आयकर संग्रहणात प्रत्यक्ष करांचा भरीव वाटा

Next

एम.सी. जोशी यांचे प्रतिपादन : ‘उत्तरायण’ प्रशिक्षणाचा समारोप
नागपूर : आयकर विभागातील संगणकीकरण व कार्यशीलतेमुळे आयकर विभागाचे काम सुलभ झाले आहे. वाढत्या आर्थिक विकासासोबत आयकर संग्रहणात प्रत्यक्ष कराचा वाटा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष एम.सी. जोशी यांनी येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) ‘उत्तरायण-२०१६’ या आयकर अधिकाऱ्यांमधून सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात एनएडीटीच्या महासंचालिका गुंजन मिश्रा, अप्पर महासंचालक आर.के. चौबे, अप्पर महासंचालिका लीना श्रीवास्तव उपस्थित होते.
जोशी म्हणाले, कर संग्रहण हे राष्ट्रीय स्थूल उत्पादनाशी प्रत्यक्षपणे निगडित असून आर्थिक विकासावर अवलंबून असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त माहितीचा संग्रह करून करदायित्वाखाली करदात्यांना आणून कर बुडव्यांनाही ओळखले पाहिजे. कर नैतिकता ही करदाते व शासन यांच्यात असली पाहिजे. करदात्यांचा विश्वास हा सरकारने त्यांना कराच्या मोबदल्यात प्रदान केलेल्या सुविधांवरून प्राप्त करता येतो, असे सांगून जोशी यांनी करसंकलनामध्ये कर नैतिकता महत्त्वाची भूमिका बजावते, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी करदात्यांना समन्स देताना तसेच कोणत्याही प्रकरणाचा पंचनामा करताना न्यायबुद्धीने वागावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
गुंजन मिश्रा यांनी आयकर खात्याविषयी जनतेमध्ये असलेली मानसिकता बदलविण्यासाठी अधिकाऱ्यांनी चांगली व उत्कृष्ट सेवा करदात्यांना प्रदान करून जनमानसात आपल्या विभागाची प्रतिमा बदलावी, असे आवाहन केले.
‘उत्तरायण-२०१६’ या प्रशिक्षणवर्गाचे प्रशिक्षण संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा अहवाल मांडला. या तुकडीमध्ये १५९ प्रशिक्षणार्थी अधिकारी असून यामध्ये १४ महिला अधिकारी आहेत. तुकडीमध्ये २२ राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी असून सर्वात जास्त अधिकारी पश्चिम बंगालमधून (४९) आहेत. या अधिकाऱ्यांनी आयकर विभागामध्ये सरासरी २४ वर्षे सेवा दिलेली आहे. आठ आठवड्याच्या या प्रशिक्षणात अधिकाऱ्यांच्या कायदेविषयक ज्ञानावर जास्त भर देण्यात आला. नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू यांच्यातर्फे अधिकाऱ्यांना कायदेविषयक ज्ञान दिले गेले.
भारताची सांस्कृतिक विविधता समजण्यासाठी ‘भारत दर्शनचे’ आयोजन करण्यात आले. यासोबतच खेड्यांमध्ये जाऊन ग्रामीण जनतेशी संवाद साधणे, औद्योगिक आस्थापनांमध्ये कर-प्रशासन बघणे इ. उपक्रम अकादमीतर्फे राबविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी योगा, जलतरण, व्यायाम यावर भर देण्यात आला.
आर.के. चौबे यांनी अधिकाऱ्यांना कर प्रशासकांची शपथ दिली. या समारंभाला आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The substantial share of direct taxes in the income tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.