स्वत:तील उणिवांचे विश्लेषण करून मिळविले यश, मित्रासोबत स्पर्धा नाही- सोमांश चोरडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:27 AM2020-01-05T04:27:26+5:302020-01-05T04:27:35+5:30
कोणतेही मोठे लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहनासोबत लहानलहान गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
नागपूर : कोणतेही मोठे लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहनासोबत लहानलहान गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष करून आपल्यातील उणिवांचे योग्य विश्लेषण करून प्रामाणिकपणे मेहनत केल्यास यश निश्चितच पदरात पडते, अशी भावना आयआयएमच्या प्रवेश परीक्षेत १०० पर्सेंटाईल मिळवित देशातून प्रथम आलेल्या नागपूरच्या सोमांश संजीव चोरडिया याने व्यक्त केली. लोकमत परिवाराचे सदस्य संजीव चोरडिया यांचे ते सुपुत्र आहेत. सध्या सोमांश आयआयटी मुंबई येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
निकाल घोषित झाल्यानंतर लोकमतशी बोलताना सोमांशने कॅट तयारीच्या सुरुवातीपासून ते परीक्षा देईपर्यंतचे अनुभव मांडले. तो म्हणाला की, आयआयटी मध्ये होणारे सेमिनार, लेक्चर व विविध कौशल्य विकासाचे कार्यक्रमामुळे भरपूर प्रोत्साहन मिळाले. मित्र राहुलसोबत कॅटची तयारी जानेवारी महिन्यापासून सुरू केली होती. त्या दरम्यान कॅटच्या तयारीचा परिणाम आयआयटीच्या अभ्यासावर होणार नाही, याची काळजी घेतली. यासाठी त्यांनी सातव्या सेमिस्टर नंतर अशा विषयाची निवड केली, ज्यात विशेष मेहनत घेण्याची गरज नव्हती. सुरुवातीला कॅटसाठी कमी वेळ दिला. आॅगस्टनंतर अभ्यासाचा वेग वाढविला. आॅगस्ट महिन्यापासून मॉक टेस्ट देणे सुरू केले. मॉक टेस्टचे निकाल बघितल्यानंतर राहुलसोबत बसून आपल्यातील उणिवांचे विश्लेषण केले. उणिवा दूर करण्याबरोबरच राहुलसोबत अभ्यास केल्याचे बरेच फायदे झाले. राहुलकडूनही बरेच काही शिकायला मिळाले. सोमांशची इच्छा आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगळुरु अथवा आयआयएम कोलकाता यातून एका ठिकाणी प्रवेश मिळवायचा आहे. भविष्यात त्याला स्वत:चा स्टार्टअप सुरू करायचा आहे.