क्राईम कॅपिटलचा ठसा पुसून काढण्यात यश : गृहमंत्री देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:48 PM2020-08-13T21:48:27+5:302020-08-13T21:50:35+5:30
राज्यात क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरवर लागलेला ठसा मिटविण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळवले आहे. नागपुरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. शहरात आता गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात क्राईम कॅपिटल म्हणून नागपूरवर लागलेला ठसा मिटविण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळवले आहे. नागपुरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. शहरात आता गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शहर पोलीस दल पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत आहे. शहरातील ११८ गुन्हेगारांवर मोकाअंतर्गत तर ५१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर, मंगेश कडव, साहिल सय्यद, तपन जयस्वालसह अनेक गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे. कुख्यात संतोष आणि साहिलने अवैधरीत्या बांधलेला बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. रोशन शेख, प्रीती दास, अफसर अंडा यासारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
मी गृहमंत्री म्हणून नागपूरच्या गुन्हेगारीचा आढावा घेतला होता. आता शहरात कोणताही कुख्यात गुंड शिल्लक नाही, अशी माहिती मला मिळाली आहे. तरीसुद्धा कुण्या गुंडांची माहिती असेल व त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असतील तर त्यांनी मला द्यावे, असे आवाहनही गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
येथे करा गुंडांची तकार
रविभवन येथे कुटीर क्रमांक ११ मधील शिबिर कार्यालयात २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत दुपारी तीन ते चार या वेळात पुराव्यासहित तक्रारी द्याव्यात. गुंडांची माहिती व पुरावे देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी हमीसुद्धा गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.