अधिकाऱ्यांचे परिश्रम व करदात्यांच्या समर्थनाने मिळाले जीएसटीचे यश-मुख्य आयुक्त के.सी. जॉनी
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 1, 2024 10:05 PM2024-07-01T22:05:11+5:302024-07-01T22:05:23+5:30
सीजीएसटी नागपूर झोनमध्ये जीएसटी दिवस साजरा
नागपूर :जीएसटीला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. जीएसटीच्या यशात अधिकाऱ्यांचे खूप परिश्रम आणि करदात्यांचे अखंड समर्थन महत्त्वपूर्ण आहे. झोनमध्ये व्यवसाय सुलभ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरूच राहतील, असे मत सीजीएसटी नागपूर झोनचे मुख्य आयुक्त के.सी. जॉनी येथे व्यक्त केले.
सीजीएसटी नागपूर झोनमध्ये १ जुलैला जीएसटी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य आयुक्त के.सी. जॉनी यांच्या दीपप्रज्वलनाने झाली. ‘सशक्त व्यापार, संपूर्ण विकास’ ही जीएसटी दिवस-२४ ची थीम होती. या कार्यक्रमाला प्रधान आयुक्त अतुल रस्तोगी, प्रधान आयुक्त विजय ऋषी, आयुक्त अविनाश थेटे, आयुक्त प्रदीप व्होरा, डीजीजीआय नागपूरचे एडीजी निळकंठ शेळके, आयुक्त संजय कुमार यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.
उपसंचालक शिवा पी. रेड्डी यांनी जीएसटीची सात वर्षे, यावर सादरीकरण केले. सीए प्रीतम बत्रा व्यापाराच्या आकांक्षा आणि अपेक्षांबद्दल बोलले. याप्रसंगी सीजीएसटी नागपूर विभागातील उत्कृष्ट करदात्यांचा सत्कार करण्यात आला आणि गुणवंत अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य आयुक्तांनी सीजीएसटी, नागपूर झोनच्या नवीन वेबसाईटचे उद्घाटनही केले. मुख्य आयुक्तांनी भाषणात अधिकारी आणि व्यापारातील सदस्यांना संबोधित केले. त्यांनी करदाते आणि कर व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सीजीएसटी नागपूर-१ आयुक्तालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.