उत्तर प्रदेशमध्ये संघाच्या ‘हर घर एक व्होट’ला यश; संघाने रचला पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 07:00 AM2022-03-11T07:00:00+5:302022-03-11T07:00:07+5:30
Nagpur News संघ परिवारातील विविध संघटनांनी राज्यभरात टप्पेनिहाय गृहसंपर्क करीत भाजपच्या व्होट बँकेतून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी मोहीमच राबविली. या मोहिमेमुळे भाजपाला मोठी मदतच झाली.
योगेश पांडे
नागपूर : उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या सलग दुसऱ्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मौलिक वाटा राहिला. पडद्याआड कार्य करीत संघ परिवारातील विविध संघटनांनी विजयाचा पाया रचला. निवडणुकांच्या काही काळ अगोदरपासून संघ परिवारातील विविध संघटनांनी राज्यभरात टप्पेनिहाय गृहसंपर्क करीत भाजपच्या व्होट बँकेतून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी मोहीमच राबविली. या मोहिमेमुळे तळागाळातील मतदार मतदानासाठी केंद्रांकडे वळले व यामुळे भाजपाला मोठी मदतच झाली. संघाचे काही पदाधिकारीदेखील निवडणुकांच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये विशेष सक्रिय झाले होते, हे विशेष.
२०१७ मधील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला होता. मागील दोन वर्षांपासून संघाने उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाच्या कालावधीतदेखील संघाचे स्वयंसेवक मदतकार्यात पुढाकार घेत होते व या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध स्तरांमध्ये संपर्क वाढविला.
संघाच्या अनेक अखिल भारतीय प्रतिनिधींनी उत्तर प्रदेशमध्ये मतदानवाढीवर विशेष भर दिला. मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते.
संघ नव्हे तर ‘लोकजागरण मंच’अंतर्गत जागृती
संघ परिवारातील संघटनांनी लोकजागरण मंचच्या नावाअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये मतदानवाढीसाठी ‘हर घर एक व्होट’ ही मोहीम राबविली. यात क्षेत्र, प्रांत, नगर, भाग व शाखा पातळीवर गृहसंपर्काचे नियोजन करण्यात आले होते. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या मोहिमेचा नियमित आढावादेखील घेत होते, अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
व्होट, हिजाब अन् विहिंप
उत्तर प्रदेश निवडणुकांचे महत्त्व विहिंपला माहिती असल्याने त्यांचे कार्यकर्तेदेखील प्रचारादरम्यान सक्रिय होते. त्यातच कर्नाटकमधील हिजाब वादामुळे व्होट बँक असलेल्या भागातून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी विशेष प्रयत्न झाले.
सामाजिक समरसता मोहिमेचा फायदा
उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक समरसतेसंदर्भात विशेष मोहीम राबविण्यात आली. यामुळे सर्व जातीधर्माच्या मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश गेला होता. याचा फायदा भाजपच्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात झाला, अशी माहिती संघाच्या उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. उत्तर प्रदेशमधील विजयासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अशी होती संघाची मोहीम
- उत्तर प्रदेशातील प्रभावी व्यक्ती व संत-महंतांच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन.
- विधानसभा क्षेत्रनिहाय मतदानवाढीसाठी नियोजन.
- क्षेत्रापासून शाखा स्तरापर्यंत हजारो व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून मतदानवाढीसाठी नियोजन.
- मान्यवरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जागृती.
- लाखो स्वयंसेवकांकडून प्रत्यक्ष तळागाळात गृहसंपर्क.