आयपीएस नारनवरे यांच्या नेतृत्वातील पथकाचे यश
By नरेश डोंगरे | Updated: March 20, 2025 18:52 IST2025-03-20T18:52:13+5:302025-03-20T18:52:40+5:30
सीएसएसआर डेमो स्पर्धा : महाराष्ट्र एसडीआरएफने पटकावले द्वितीय स्थान

Success of the team led by IPS Naranware
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य राखीव दलासह रेल्वे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयपीएस अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वातील पथकाने शोध आणि बचावाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनात सीएसएसआर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एनडीआरएफच्या बटालियन पांच सुदुंबरे (पुणे) येथे १७ आणि १८ मार्चला ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रासह देशातील राजस्थान, गुजरात, दीवदमन, मध्य प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांच्या चमूंनी सतर्कतेसोबतच शोध आणि बचाव कशा प्रकारे करायचा, त्याचे प्रात्यक्षिक या स्पर्धेत सादर केले होते. त्यात एसडीआरएफ दीवदमनच्या पथकाने प्रथम तर महाराष्ट्राच्या पथकाने द्वितीय पुरस्कार पटकावला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पीएसआय भंडारे आणि पीएसआय गावंडे यांनी या पथकाचे नेतृत्व केले होते. या यशाबद्दल राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एसआरपीएफ) सुरेश मेकला यांनी डॉ. नारनवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका कार्यक्रमात ट्रॉफी प्रदान केली. यावेळी एनडीआरएफ बटालियन पुणेचे मोहसिन शाहेदी, संतोष शाहेदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्पर्धेत लागला नंबर
शोध आणि बचावाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महाराष्ट्र आणि दीवदमन या दोन्ही राज्याच्या चमू आता अशाच प्रकारच्या राष्ट्रीय स्वरूपाच्या सीएसएसआर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. ही स्पर्धा दिल्ली येथे होणार असून, त्याही स्पर्धेत अव्वलस्थानी जाण्याचा मानस या पथकाने व्यक्त केला आहे.