‘पृथा’च्या यशाने प्रार्थनेला अर्थ आला : मिळविले ९८.६० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:41 PM2020-07-29T22:41:47+5:302020-07-29T22:43:22+5:30
वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळवून तिने सर्व अंदाजच खोटे केले.
निशांत वानखेडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळवून तिने सर्व अंदाजच खोटे केले. तिचे जगणे अनेकांना चमत्कारासारखे वाटते. पण यामागे आहेत तिला वाचविण्यासाठी आईवडिलांनी उपसलेले कष्ट. आज त्या प्रार्थनांना अर्थ आला आहे.
ती आहे पृथा पराग वेणी. पृथा ९८.६० टक्के गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि ओल्या डोळ्यात आईवडिलांना तिच्या जन्मापासूनचा सारा प्रवास आठवला. पृथाचे वडील एका फार्मा कंपनीत मॅनेजर आणि आई प्रीती वेणी या एका शाळेत नृत्य शिक्षिका. पृथाचा जन्म ठराविक कलावधी पूर्ण होण्यापूर्वी (प्रीमॅच्युअर) झाला. अतिशय अशक्त असल्याने डॉक्टरांनी सांगितले, ती वाचूच शकणार नाही. तिच्या जगण्याची शक्यता आहे केवळ २ टक्के. आईवडिलांचे अवसान गळाले पण विश्वास नाही. तीन महिन्यानंतर पुन्हा तपासणी केली तेव्हा, ही मतिमंद होईल, अशी शंका डॉक्टरांनी उपस्थित केली. पृथा सहा महिन्याची झाली. पुन्हा तपासले तेव्हा हालचाल मंद असल्याने ती कमरेपासून अपंग होईल, अशी दाट शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. यावेळीही सर्वांना निराशेने घेरले. मात्र नृत्यात विशारद असलेल्या आईने निश्चय केला, मुलीला अपंग होऊ देणार नाही. या क्षणापासून आईबाबाची तिला जगविण्याची जणू धडपडच सुरू झाली.
या डॉक्टरांकडून तो डॉक्टर. अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नॅचरोपथी आणि जमेल ते सर्वकाही. वैद्यकीय प्रयत्नासोबत प्रार्थनाही होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. पृथा सामान्य मुलांसारखी हसू-खेळू लागली. सहा वर्षाची झाली तेव्हा पृथाने नृत्यात पहिला पुरस्कार मिळविला आणि आईची जिद्द पूर्ण झाली. मग काय, कधी ही स्पर्धा तर उद्या ती. शालेय स्तरापासून राष्टÑीय स्तराचे पुरस्कार तिने मिळविले. पृथा आता कथ्थक शिकते आहे आणि सोबत आईच्या नृत्यवर्गात येणाऱ्या मुलांनाही शिकवते.
टाटा पारसी शाळेत शिकणाऱ्या पृथाचे दहावीचे यश तिची बुद्धिक्षमता सांगण्यास पुरेसे आहे. पृथाने आयएएस होण्याचे ध्येय मनात बाळगले आहे आणि नेहमीप्रमाणे ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तिच्यात दिसतो. कधी तिला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या आईबाबाची प्रार्थना पूर्ण झाली.