शिवरायांचा वारसा अन् विद्युलतेचा वेग
By admin | Published: September 30, 2016 03:21 AM2016-09-30T03:21:21+5:302016-09-30T03:21:21+5:30
भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून हे हल्ले झाले.
शत्रूच्या वर्मावर हल्ला करणारा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : कमी काळात शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्यावर असतो भर
योगेश पांडे नागपूर
भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून हे हल्ले झाले. साधारणत: प्रगत देशांतर्फे युद्धाची ही प्रणाली वापरण्यात येते असा समज आहे. परंतु युद्धाची ही प्रणाली भारतीयांसाठी अजिबात नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा एक प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’च होता. आधुनिक युद्धकौशल्यातील हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. शत्रूच्या तळात विद्युलत्तेच्या वेगाने प्रवेश करायचा आणि कमी वेळात जास्तीत जास्त नुकसान होईल याप्रकारे हल्ला करायचा अशी ही प्रणाली असून जास्तीत जास्त अर्धा तासात ही मोहीम आटोपती घ्यावी लागते.
यासंदर्भात ‘लोकमत’ने भारतीय सैन्यदलातून ‘कमांडो’चे प्रशिक्षण घेतलेले व विविध मोहिमांमध्ये सहभागी झालेले निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’बाबत जाणून घेतले.
शत्रूवर हल्ला करा, त्याला संपवा व परत फिरा, अशी या हल्ल्याची संकल्पना आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ची संकल्पना आपल्या देशात अगोदरपासून वापरली जाते. शिवाजी महाराजांनी लाल महालात बेसावध असलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मुघलांचे नुकसान झाले होते. हे या युद्धप्रणालीचे सर्वात चांगले उदाहरण म्हणता येईल, असे कर्नल देशपांडे यांनी सांगितले.
जास्तीत जास्त अर्धा तास चालते मोहीम
‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती शत्रूच्या तळांची अचूक माहिती. ही माहिती मिळाल्यानंतर या मोहिमेचे नियोजन केले जाते. आजच्या काळात दोन प्रकारे ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले जाऊ शकतात. जमिनीवरूनच शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करायचा आणि प्रचंड वेगाने त्यांच्या तळावर हल्ला करायचा. दुसरा प्रकार असतो हवाईमार्गाने शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करायचा. ‘चॉपर’ तळापासून सुरक्षित अंतरावर उतरवायचे आणि तेथून विजेच्या गतीने शत्रूच्या तळावर हल्लाबोल करायचा. म्यानमारमध्ये झालेल्या मोहिमेत भारतीय सैन्याने दुसऱ्या प्रकाराचा उपयोग केला होता. ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा कमी कालावधीचा हल्ला असतो. जास्तीत जास्त अर्धा तास ही मोहीम चालू शकते. त्याहून अधिक वेळ थांबल्यास हल्ला करणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
‘स्ट्राईक’साठी योग्य नियोजन आवश्यक
प्रचंड वेगाने शत्रूच्या छावणीत प्रवेश करणे, कमी काळात जास्तीत जास्त नुकसान कसे होईल यादृष्टीने हल्ला करणे व जवळील सर्व शस्त्रांचा उपयोग करून विजेच्या गतीने परत जाणे ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ची विशेषता असते. अशा हल्ल्यामुळे शत्रूला सावरायला वेळ मिळत नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’ अगोदर नियोजन आवश्यक असते. आत शिरण्याचा मार्ग व बाहेर पडण्याचा मार्ग अगोदरच ठरवून ठेवावे लागतात, असे कर्नल देशपांडे यांनी स्पष्ट केले.