यशोगाथा; जे मनात आहे, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:57 AM2018-11-12T09:57:09+5:302018-11-12T09:58:48+5:30
एक-दोन नव्हे तर देशभरातील ५० शाळा, आश्रमशाळा व बालगृहांचा कायापालट मैत्रेयी जिचकार या तरुणीच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘झीरो ग्रॅव्हीटी’च्या माध्यमातून करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी शाळांची वाईट परिस्थिती पाहून इतरांप्रमाणे तिचेही मन अस्वस्थ होत होते. पण नुसती खंत व्यक्त करून ती गप्प बसली नाही, तर या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्धार तिने केला. युनिसेफच्या ‘बिल्डिंग अॅज लर्निंग एड’ (बाला) या योजनेची मदत घेत अशा उजाड झालेल्या शाळांच्या भिंतींची रंगरंगोटी, वर्गखोल्यांना अभ्यासक्रमातील विषयानुरूप कलात्मक रूप दिले व विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी लागेल, अशी आकर्षकता निर्माण केली. अशा एक-दोन नव्हे तर देशभरातील ५० शाळा, आश्रमशाळा व बालगृहांचा कायापालट मैत्रेयी जिचकार या तरुणीच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘झीरो ग्रॅव्हीटी’च्या माध्यमातून करण्यात आला.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात चालत असलेल्या वाटेपेक्षा काही तरी नवीन करण्याची, मिळविण्याची इच्छा असते. पण कधी परिस्थितीच्या नावाने किंवा या नव्या वाटेने चालताना यश मिळेल की नाही, या भीतीपोटी आपल्या इच्छा मनातच दाबत असतो. पण भीती मनात बाळगून चांगले काही गमावण्यापेक्षा जे मनात आहे ते प्रामाणिकपणे करा, यश नक्की मिळेल. अशा वेगळ्या वाटेवर चालणाºया वेगळ्या वल्लींचा प्रेरणादायी प्रवास ‘टेड-एक्स’तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. मैत्रेयीसह मेकर्स अड्डाचे ललित विकमशी, संगीतवाद्य निर्माते परविंदर सिंह, ‘समलैंगिक’साठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य शिकविणारे सुमंत टेकाडे व गिटारिस्ट रोनॉल्ड जॉन यांनी त्यांचा प्रवास तरुणांसमोर मांडला.
मैत्रेयीच्या संस्थेत ८०० ते ९०० स्वयंसेवक सेवा देतात. त्यातील सक्रिय सदस्य सातत्याने या उपक्रमाशी जुळले आहेत. मैत्रेयीने सुरुवातीला नागपुरातील मनपाच्या शाळांसाठी ही संकल्पना मांडली होती, मात्र महापालिकेले त्यास नकार दिला. मात्र आज तिचे यश पाहून उच्च न्यायालयानेच शहरातील पाच शाळांना बदलविण्याचे कंत्राट संस्थेला दिले आहे.
मनात असेल ते शिकविणारी शाळा : विकमशी
आपली शिक्षण व्यवस्था एका साच्यात बांधली आहे. अभ्यासक्रमातील गोष्टींची घोकंपट्टी करा आणि परीक्षेत गुण मिळवा, हीच काय ती साचेबद्धता. त्यात विद्यार्थ्यांच्या मनात कल्पना सुचायला वाव नाही. ललित विकमशी यांना ते नको होते. कुणाला कलेची आवड आहे तर कुणाजवळ नवीन काहीतरी निर्माण करण्याची कल्पना आहे. अशा कलात्मक व कल्पकांसाठी त्यांनी १५ वर्षांपूर्वी ‘अलग अँगल’ व ‘मेकर्स अड्डा’ ही वेगळ्याच प्रकारची शाळा काढली. या अनोख्या शाळेतूनच परविंदरसारख्या तरुणाला नवीन संगीतवाद्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. हा अनोख्या शाळेचा प्रवास विकमशी यांनी मांडला. यावेळी सुमंत टेकाडे, रोनॉल्ड जॉन व निकुंज जोशी यांनीही आपल्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला.