यशाची गाथा : प्रशांत उगेमुगे यांनी दाखविली प्रेरणावाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:05 PM2019-05-08T21:05:42+5:302019-05-08T21:08:22+5:30
विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रशांत उगेमुगे यांनी जेसीआय नागपूर मेडिकोच्या यशाची गाथा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांसोबत आपले अनुभव वाटून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणावाट दाखविली. उगेमुगे हे शहरातील यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या जीवन प्रवासातून सर्वांना यशाचे रहस्य कळले. हा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये नुकताच पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रशांत उगेमुगे यांनी जेसीआय नागपूर मेडिकोच्या यशाची गाथा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांसोबत आपले अनुभव वाटून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणावाट दाखविली. उगेमुगे हे शहरातील यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या जीवन प्रवासातून सर्वांना यशाचे रहस्य कळले. हा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये नुकताच पार पडला.
जेसीआय नागपूर मेडिकोच्या अध्यक्ष डॉ. स्मिता पाखमोडे यांनी प्रशांत उगेमुगे यांची मुलाखत घेतली. व्यवसायातील प्रगतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उगेमुगे यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयक्षमतेवरील विश्वास व कंपनीच्या प्रदर्शनाचे नियमित मूल्यमापन या दोन गोष्टी आपल्या यशाचे रहस्य असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी आपल्या जीवनप्रवासाचीही विस्तृत माहिती दिली. त्यातून त्यांचे नाविन्यपूर्ण विचार, निर्णय घेण्याची क्षमता, धोका स्वीकारण्याची तयारी, कठीण परिस्थितीत योग्य मार्ग शोधण्याची कला इत्यादी गुणांचे दर्शन घडले. याशिवाय त्यांनी डॉक्टरांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला. आपण स्वत:च्या आनंदाला प्राधान्यक्रम द्यायला हवा. आपण आनंदी राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवू शकू, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
उगेमुगे कुटुंबीय व मित्रांचे लाडके आहेत. त्याचे रहस्य त्यांच्या ‘मी’रहित व्यक्तिमत्त्वात असल्याचे यावेळी पुढे आले. उगेमुगे स्वत:च्या आधी कुटुंबीय व मित्रांचा विचार करतात. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. तसेच, मुलाच्या विकासाकडे त्यांचे सूक्ष्म लक्ष असते हेदेखील त्यांनी सांगितले. सुरुवातीला डॉ. अपेक्षा बालपांडे यांनी उगेमुगे यांची जुनी छायाचित्रे, मित्र व कुटुंबीयांची त्यांच्याबद्दल असलेली मते याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने उगेमुगे यांना आश्चर्यचकित केले. सादरीकरणाकरिता सहकार्य करणारे श्रेयस उगेमुगे यांचे पाखमोडे यांनी आभार मानले.
याच कार्यक्रमात बॅरॉन इन्टेग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीचे संचालक कुलदीप शिवणकर व सेव्हन स्टार रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रशांत रहाटे यांचीही मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमात डॉ. गिरीश चरडे, डॉ. सुशील लोहिया, राजेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते. मिसेस इंडिया वेस्ट एम्प्रेस स्पर्धा जिंकणाऱ्या डॉ. वर्तिका पाटील यांचा सत्कार करण्यात आला.