यशोगाथा! उच्च शिक्षणाचा लाभ कुणाच्या ताबेदारीसाठी नव्हे, तर स्वतःच्या शेतीसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2023 08:00 AM2023-06-07T08:00:00+5:302023-06-07T08:00:02+5:30
Nagpur News काही उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. कळमेश्वर तालुक्यातील पिपळा (किनखेडे) येथील अमोल भैयाजी फुलारे आणि कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांची यशोगाथा अशीच आहे.
जितेंद्र ढवळे
नागपूर : ग्रामीण भागात बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येते. चार वर्षांपासून शासकीय पदभरती नाही. पदभरती झाली तर नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. यावर मात करीत काही उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. कळमेश्वर तालुक्यातील पिपळा (किनखेडे) येथील अमोल भैयाजी फुलारे आणि कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांची यशोगाथा अशीच आहे. या दोन तरुणांनी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत कर्तृत्व सिद्ध केले आहे.
- उच्च शिक्षणाचा लाभ शेतीसाठी, धंद्यासाठी
उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न पडता अमोल आणि सचिन यांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला. आपण जे शिकलो ते कृतीत कसे साकारता येईल. यातून इतरांना कसा रोजगार मिळवून देता येईल, या उद्देशाने हे तरुण सध्या काम करीत आहेत.
-अमोल फुलारे, ता. कळमेश्वर (७ एकर शेती, रोपवाटिका)
पिपळा (किनखेडे) येथील अमोल फुलारे यांच्याकडे ७ एकर शेती आहे. पारंपरिक शेतीसोबत त्यांनी संत्रा रोपवाटिका तयार केली आहे. शेतकऱ्यांना ते उत्कृष्ट दर्जाची संत्र्याची रोपे तयार करून देतात. याशिवाय ४ एकरांत त्यांचा संत्र्याचा बगिचा आहे. संत्रा विक्रीतून ते वर्षाला ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. याशिवाय ३० आर क्षेत्रात त्यांनी संत्रा रोप (पणेरी) सुरू केली आहे. वर्षभरात ते संत्र्याची ४० हजार रोपे तयार करतात. ४० रुपयांप्रमाणे या रोपाची ते विक्री करतात.
सचिन चिकनकर, ता. कामठी (४ एकर शेती, डेअरी फार्म)
कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे सीताफळाची बाग आहे. त्यांनी शेतात आदर्श डेअरी फार्म उभे केला आहे. सध्या त्यांच्याकडे २१ गायी असून, रोजचे दुधाचे उत्पादन २१० लिटर इतके आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरीच्या माध्यमातून बिना येथील फार्मवर इतर शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातूनही सचिन यांना नवा रोजगार मिळाला आहे.
एकाचे शिक्षण एम.ए., बी.एड., तर दुसऱ्याचे अभियांत्रिकी
पिपळा (किनखेडे) येथील अमोल फुलारे एम.ए., बी.एड. आहेत. ग्रामविकासाचा संकल्प करीत ते स्वयंरोजगाराकडे वळले. बिना येथील सचिन चिकनकर यांनी बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) केले आहे.
३) वर्षाला उत्पन्न किती?
संत्रा रोपवाटिका आणि शेतीतून अमोल फुलारी यांना वर्षाला ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न होते, तर दुग्ध व्यवसायातून सचिन चिकनकर यांची वार्षिक कमाई १० लाख रुपये इतकी आहे.
कष्टाशिवाय फळ नाही
नोकरी लागली नाही म्हणून काहीच करायचे नाही, असे कुणी सांगितले आहे. शिक्षण हे यशाचा मार्ग मिळविण्याचे माध्यम आहे. पुढे जायचे आहे, तर कष्ट करावेच लागतील.
-अमोल फुलारी, पिपळा (किनखेडे), ता. कळमेश्वर
उच्च शिक्षण घेतले म्हणजे नोकरी मिळेलच असे नाही. चांगल्या नोकरीची अपेक्षा करणे चुकीचेही नाही. मात्र, शिक्षणाचा फायदा रोजगार निर्मितीसाठी झाला, तर अधिक चांगले.
-सचिन चिकनकर, बिना, ता. कामठी