संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:13 AM2021-07-02T05:13:23+5:302021-07-02T05:15:15+5:30
दिलीप वेंगसरकर : फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता
नीलेश देशपांडे
नागपूर : चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘कर्नल’ नावाने ओळखल्या जाणारे वेंगसरकर लॉर्ड्सवर १९८६ मध्ये शतकांच्या हॅटट्रिकसह विजयाचे शिल्पकार ठरले होते.
लोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये यशाचे रहस्य फलंदाजी ठरेल. जर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली तर त्यांना त्यांच्याच देशात आव्हान देता येईल.’ विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करू शकतो का, याबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘का नाही? कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या शानदार कामगिरीची पूर्ण आशा आहे. संघ समतोल असून मालिकेच्या वाटचालीसह कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते.’
संघाच्या संयोजनाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘खेळपट्टीचे स्वरूप बघून किती फिरकीपटूंना संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. पण, माझ्या अनुभवावरून असे वाटते की, इंग्लंडमध्ये या वातावरणात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.’
n पुजाराच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडूची आपली एक शैली असते. त्याचसोबत प्रत्येक खेळाडूला न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेगवेगळा अवधी लागतो. अनेकदा कुणी यशस्वी ठरतो. त्यामुळे केवळ पुजाराच नव्हे तर अन्य फलंदाजही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरू शकतात.‘
...त्यामुळे डब्ल्य यूटीसी फायनलमध्ये पराभव
n डब्ल्य यूटीसी फायनलमधील पराभवासाठी वेंगसरकर यांनी सराव सामना न खेळायला मिळणे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.
n ते म्हणाले, ‘इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सराव सामने खेळणे आवश्यक आहे. इंट्रा स्क्वाॅड लढतींना काही अर्थ नसतो.‘