टेक्नोसॅव्ही आणि कम्युनिटी पुलिसिंगला यश

By Admin | Published: July 25, 2016 02:35 AM2016-07-25T02:35:25+5:302016-07-25T02:35:25+5:30

राज्य पोलीस दलाला टेक्नोसॅव्ही बनवितानाच जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी पोलीस दलाला नागरिकांशी एकरूप करण्याचे आपण प्रयत्न केले. ....

Success of Technosavi and Community Policing | टेक्नोसॅव्ही आणि कम्युनिटी पुलिसिंगला यश

टेक्नोसॅव्ही आणि कम्युनिटी पुलिसिंगला यश

googlenewsNext

पोलीस महासंचालक दीक्षित : लोकमतशी विशेष बातचित
नरेश डोंगरे नागपूर
राज्य पोलीस दलाला टेक्नोसॅव्ही बनवितानाच जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी पोलीस दलाला नागरिकांशी एकरूप करण्याचे आपण प्रयत्न केले. त्यात यश आले. तब्बल दोन लाख नागरिक आज पोलीस मित्र बनले आहेत. घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांची मोलाची मदत मिळत आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच पोलीस मित्र संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देतात. त्यामुळे गुन्हेगारांना अटकाव करून गुन्हे रोखण्यात यश मिळते. ही राज्य पोलीस दलाची मोठी उपलब्धी आहे, असे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलीस महासंचालक म्हणून दीक्षित यांचा कार्यकाळ ३१ जुलैला पूर्ण होत आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला नागपुरात फाशी झाल्यानंतर छोटा शकीलने दिलेली धमकी आणि त्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार सांभाळला. ‘मिस्टर क्लिन‘ म्हणून ओळखले जाणाऱ्या दीक्षित यांनी आपल्या उण्यापुऱ्या वर्षभराच्या कार्यकाळातही स्वत:ची प्रतिमा जपतांनाच राज्याच्या पोलीस दलाला ‘कम्युनिटी पुलिसिंग‘चा चेहरा देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. आता त्यांच्या कार्यकाळाला केवळ एकच आठवडा शिल्लक आहे. रविवारी ते नागपुरात होते. त्यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी पोलीस दल आणि राज्याच्या स्थितीवर मनमोकळी चर्चा केली.

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ...
आपल्या कार्यकाळातील कामगिरीवर आपण पूर्ण समाधानी आहोत, असे प्रारंभीच त्यांनी स्पष्ट केले. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस दलाची खास उपलब्धी काय, असे विचारले असता ते म्हणाले, पोलिसांकडे नागरिक येण्याऐवजी नागरिकांच्या जवळ पोलिसांनी जावे म्हणून प्रयत्न केले. तक्रार नोंदवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी अथवा गुन्ह्याची माहिती देण्यासाठी याला त्याला हात जोडून विनंती करण्याची आता नागरिकांना गरज उरली नाही. कुण्या दलालाचे काम राहिले नाही. सीसीटीएनएस ई कम्प्लेंट सारखे उपक्रम सुरू केले. सोशल मीडिया, ई-अ‍ॅप च्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांशी जोडले. अनेक हेल्पलाईन निर्माण केल्या. त्याचमुळे महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांचा विश्वास मिळवण्यात यश मिळाले. परिणामी तब्बल दोन लाख नागरिक पोलिसांचे मित्र बनले आहेत. देशाच्या इतर कुठल्याही राज्यात एवढ्या मोठ्या संख्येत पोलिसांचे मित्र नाहीत, ही गौरवाची बाब वाटते. त्यातून नागरिकांना थेट पोलिसांची मदत मिळवता येते. पोलिसांना मदत करता येते. घरबसल्याच मोबाईलवरून किंवा एका क्लिकवरून पोलिसांना हवी ती माहिती पुरविता येते. तक्रारही नोंदवता येते. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा झाला.

सर्वात सुखद काय ?
सर्वाधिक सुखद बाब आहे ती हरविलेल्यांना शोधून परत त्यांच्या कुटुंबात पोहचवण्याची. राज्य पोलीस दलाने वर्षभरात महाराष्ट्रातील १५ हजार नागरिकांना (मुले, मुली, महिला, पुरूष) शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली केले.

जर तर वर विश्वास नाही
आपल्याला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार,अशी चर्चा आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ‘आपल्याला ते माहीत नाही’, असे दीक्षित म्हणाले. पुन्हा मुदतवाढ मिळाली तर... या प्रश्नावर बोलताना, जर तर वर आपला विश्वास नसल्याचे दीक्षित म्हणाले. लोकांना सजग करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले. पोलीस दलाच्या पारंपरिक चेहऱ्याला ‘टेक्नॉलॉजी’ची जोड देत तपासाला गती देण्याचे प्रयत्न केले. भक्कम पुरावे गोळा केल्यास आरोपीला शिक्षा हमखास होते. अर्थात् कन्व्हीक्शन रेट वाढतो. त्यासाठीही शक्य ते सर्व प्रयत्न केले. मुदतवाढ मिळाल्यास आणखी चांगले काम करू, असे दीक्षित म्हणाले. महिला मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढताहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता दीक्षित म्हणाले, महिला मुलींवरील अत्याचार ही चिंतेची बाब आहे. कोपर्डी आणि नागपुरातील ताज्या घटनांचा आपण केलेला उल्लेखही बरोबर आहे. महिला-मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठीच प्रतिसाद अ‍ॅप, दामिनी स्क्वॉड तयार करण्यात आले. काही ठिकाणी दामिनी स्क्वॉडची कामगिरी समाधानकारक नसेलही परंतु अनेक ठिकाणी दामिनी स्क्वॉड प्रभावीपणे काम करीत आहे. तरीसुद्धा अशा घटना घडत असेल तर यापुढे मात्र, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी राज्य पोलीस दल अधिक चौकसपणे काम करेल. राज्यात आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण फार वाढले आहे. अनेक ठगबाज आयुष्यभराची कमाई हिरावून घेत असल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या तर अनेक जण अक्षरश: रस्त्यावर आले आहेत.आयुष्याच्या सायंकाळी त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दोन प्रकारे राज्य पोलीस प्रयत्न करीत आहेत.एक म्हणजे, शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. असे घोटाळे होऊ नये, अर्थात आर्थिक घोटाळे करणारांना तातडीने कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आपण स्वत: राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो आहे. लवकरच तसा अध्यादेश अपेक्षित आहे. ठगबाजांनी हडपलेल्या संपत्तीची कायदेशीर निलामी करून पीडितांना त्यांची रक्कम परत करण्याचाही त्यामागे उद्देश आहे. दुसरे म्हणजे, ठगबाज किंवा त्यांच्या दलालांच्या आमिषाला नागरिकांनी बळीच पडू नये म्हणून पोलिसांमार्फत, पोलीस मित्रांमार्फत प्रचार प्रसार करण्याचे तंत्र आम्ही अंगिकारले आहे. जनजागृती झाल्यास असे घोटाळे घडणार नाही अन् घोटाळे करण्याचा कट रचणारांवर लगेच कारवाईही करता येईल.

Web Title: Success of Technosavi and Community Policing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.