२९ सप्टेंबरची यशस्वी प्रवेश चाचणी रद्द, एनटीएचा गाेंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 09:29 AM2023-09-28T09:29:15+5:302023-09-28T09:29:37+5:30

२२ ला परीक्षेची जाहिरात, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमाेड

Successful entrance test of 29th September cancelled, NTA's confusion | २९ सप्टेंबरची यशस्वी प्रवेश चाचणी रद्द, एनटीएचा गाेंधळ

२९ सप्टेंबरची यशस्वी प्रवेश चाचणी रद्द, एनटीएचा गाेंधळ

googlenewsNext

निशांत वानखेडे 
लोकमत न्यूज नेटवर्क    
नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे ओबीसी, ईबीसी व डीएनटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी २९ सप्टेंबरला हाेणारी ‘यशस्वी प्रवेश चाचणी’ अचानक रद्द करण्याची घाेषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी पत्रकाद्वारे केली. विशेष म्हणजे २२ सप्टेंबरला परीक्षेची जाहिरात  देण्यात आली आणि चार दिवसांत २६ सप्टेंबरला परीक्षा रद्द करण्याचे पत्रक काढण्यात आले. 

केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे इतर मागासवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) व डीएनटीच्या इयत्ता ९ व १० आणि इयत्ता ११ व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘यंग अचीव्हर्स अवाॅर्ड स्काॅलरशिप’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी इयत्ता आठवी आणि इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी एन्ट्रंस टेस्ट’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. एनटीएद्वारे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९वी व १० वीत प्रतिवर्षी ७५ हजार आणि ११ व १२ वीच्या पात्र विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांवर दडपण नकाे म्हणून...
एनटीएच्या पत्रकानुसार यशस्वी प्रवेश परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांच्या आठवी व १०वीच्या गुणांच्या आधारावरच ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ६० टक्क्यांच्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर नॅशनल स्काॅलरशिप पाेर्टलवरून विद्यार्थ्यांची निवड हाेईल, असे पत्रकात नमूद आहे. विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचे दडपण नकाे म्हणून ही परीक्षा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याआधीही दाेन याेजनेच्या परीक्षा बंद
केंद्र सरकारने यापूर्वी नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) परीक्षा व किशाेर वैज्ञानिक प्राेत्साहन याेजना सुरू केली हाेती. मात्र, दाेन वर्षांपूर्वी या दाेन्ही याेजना बंद झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ही तिसरी याेजना बंद करण्याचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे.

आमच्या शाळेत १८ विद्यार्थी या परीक्षेला बसले हाेते व त्यांनी कसून तयारी केली हाेती. मात्र अचानक ही परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर दडपण येत असल्याचे कारण दिले जाते, तर मग परीक्षाच कशाला जाहीर केली?  
- सय्यद मकसूद पटेल, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल, यवतमाळ

Web Title: Successful entrance test of 29th September cancelled, NTA's confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.