उपराजधानीत मायट्रल व्हॉल्व्हचे यशस्वी रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:28 AM2020-02-21T11:28:24+5:302020-02-21T11:28:47+5:30
छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत पाश्चात्य देशातून ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ मागावे लागायचे. परंतु पहिल्यांदाच भारतात तयार झालेल्या या व्हॉल्व्हचे रोपण नागपुरात झाले. मध्यभारतातील हे पहिले प्रकरण आहे, अशी माहिती प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनी दिली.
मोरेश्वर भावे या ७० वर्षीय रुग्णावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ बदलविण्यात आले होते. आठ वर्षानंतर त्यांना पुन्हा धाप लागणे, हृदयात धडधड होणे आणि दुखणे वाढले होते. भावे यांनी ‘न्यू इरा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ गाठले. डॉ. मिश्रा यांनी त्यांची तपासणी केली. इकोकार्डिओग्राफीमध्ये हृदयात बसविण्यात आलेले ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ खराब झाल्याचे निदान झाले. परंतु या पूर्वी झालेली शस्त्रक्रिया व वय पाहता पुन्हा ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. यावर दुसरा उपाय म्हणून खराब झालेल्या झडपेवर दुसरी झडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. मिश्रा म्हणाले, याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्स कॅथेटर मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लसेमेन्ट’ म्हणतात. ज्या पद्धतीने अॅन्जिओग्राफी केली जाते त्याच पद्धतीने जांघेच्या शिरातून कॅथेटर टाकण्यात आले. दोन हृदयकप्प्यातील पडद्यास छिद्र पाडून जुन्या ‘मायट्रल व्हॉल्व्ह’वर नवी झडप लावण्यात आली. टेबलावरच इकोद्वारे चाचणी करून ‘व्हॉल्व्ह’ योग्य जागी व पक्के बसल्याची खात्री करण्यात आली. विशेष म्हणजे, व्हॉल्व्ह लावताच हृदयाची क्रिया व गती सुरळीत झाल्याने रक्तदाबही सामान्य झाला. या शस्त्रक्रियेमुळे भावे यांना पुन्हा नवेजीवन मिळाले, असेही त्यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिश्रा, यांच्यासह हृदयारोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती, न्युरोलॉजिकल व स्पाईन सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र मस्के, डॉ. सुबुंल सिद्दिकी व डॉ. साहिल बन्सल यांनी यशस्वी केली.
मेक इन इंडियाची मदत
डॉ. मिश्रा म्हणाले, कालपर्यंत ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ भारतात तयार होत नव्हते. ते पाश्चात्य देशातून मागवावे लागायचे. यात वेळ व पैसाही मोठा खर्च व्हायचा. आता मेक इन इंडिया अभियनांतर्गत भारतातच मेरील कंपनीने मायट्रल व्हॉल्व्ह तयार करणे सुरू केले. भारतात तयार झालेला हा व्हॉल्व्ह मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच रोपण करण्यात आले.