रिच-२ मार्गावर मेट्रोचे ट्रायल रन यशस्वी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:02+5:302021-06-03T04:08:02+5:30
नागपूर : सीताबर्डी एक्स्चेंज ते ऑटोमोटिव्ह मार्गावर (रिच-२) झीरो माइल्स ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो ट्रेनचे ट्रायल रन ...
नागपूर : सीताबर्डी एक्स्चेंज ते ऑटोमोटिव्ह मार्गावर (रिच-२) झीरो माइल्स ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो ट्रेनचे ट्रायल रन बुधवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. डिसेंबर २०२१ पर्यंत सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. ट्रायल रन त्याची एक सुरुवात आहे.
एक किमीच्या मार्गावर २० किमी प्रति तास गतीने ट्रायल रन घेण्यात आले. या मार्गावर सिग्नलिंग, ओएचई (विद्युत खांब) आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कार्य महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात पूर्ण केले जात आहे. या ट्रायल रनची चाचणी पूर्ण केल्याबद्दल डॉ. दीक्षित यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. २० मजली झीरो माइल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन इमारतीच्या चौथ्या मजल्यातून ट्रेनचे संचालन होणार आहे. झीरो माइल मेट्रो स्टेशन येथे अनोखे मास स्प्रिंग सिस्टीम (एमएसएस) बसविण्यात आली आहे. ते मेट्रो रेल्वेच्या हालचालीमुळे उद्भवणारे कंपन थांबविते. व्हायाडक्ट येथे अशाप्रकारचे फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबवर यंत्रणा बसविणारा नागपूर मेट्रो प्रकल्प पहिला आहे.
महामेट्रो झीरो माइल फ्रिडम पार्क व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे विकास कार्य करीत असून, झीरो माइल स्टेशनवरील भागात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विशेष मार्केट तयार करण्यात येत आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. तिथे २१ दुकाने तयार केली जातील. या मार्केटवर २.४० लाख चौरस फूट जागेत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर व्यावसायिक परिसर तयार करण्यात येणार आहे. स्टेशनला फ्रिडम पार्कला भारतीय स्वातंत्र्य लढा व भारतीय संरक्षण दल, अशी थीम देण्यात येणार आहे. १८५७ व १९४७ लढ्यातील विशेष घडामोडी स्टेशन परिसरात दर्शविल्या जातील. या दोन्ही महत्त्वपूर्ण घटनांचा शहरात ऐतिहासिक वारसा आहे. नागपूर व सिव्हिल लाइन्स परिसरातील घटना या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील. कस्तुरचंद पार्क स्टेशनच्या लगत मेट्रो प्रवाशांकरिता दुमजली पार्किंग निर्माणाधीन आहे. रिच-२ मार्गावर विधान भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कस्तुरचंद पार्क असे महत्त्वाचे ठिकाण आहे.