पावणेदोन वर्षांच्या 'सबुरी'नंतर देशमुख उद्या ‘श्रद्धा’ बंगल्यावर परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 07:42 PM2023-02-10T19:42:23+5:302023-02-10T21:17:04+5:30
Nagpur News ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर देशमुख हे शनिवारी पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत.
नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग व निलंबित फौजदार सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ईडीने लावलेल्या आरोपातही तथ्य नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. देशमुख यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा कट होता, असा आरोप करीत देशमुखांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख पत्रके वाटली जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, शेखर सावरबांधे, आभा पांडे, रमण ठवकर, जानबा मस्के आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. पेठे म्हणाले, ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर देशमुख हे शनिवारी पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून ते जीपीओ चौकातील त्यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढली जाईल. चौकाचौकांत स्वागत केले जाईल.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. सीबीआय व ईडीने १३० हून अधिक वेळा देशमुख यांचे घर व प्रतिष्ठानांची तपासणी केली. २५० जणांची चौकशी केली. मात्र, काहीच सापडले नाही. ३० वर्षांहून अधिक काळाची राजकीय कारकीर्द एकही गुन्हा नसणारी आहे. त्यामुळेच अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचेही पेठे यांनी सांगितले.