प्लॅटफॉर्म शाळेच्या गणेशवर यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Published: June 30, 2017 02:47 AM2017-06-30T02:47:30+5:302017-06-30T02:47:30+5:30

प्लॅटफॉर्म शाळेतील गणेश कुमरे हा १५ वर्षीय मुलगा तोंडाच्या आजाराने त्रस्त होता.

Successful Surgery of Platform School Ganesh | प्लॅटफॉर्म शाळेच्या गणेशवर यशस्वी शस्त्रक्रिया

प्लॅटफॉर्म शाळेच्या गणेशवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next

सामाजिक संस्थांकडून मिळाली मदत : लोकमतने केले होते मदतीचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लॅटफॉर्म शाळेतील गणेश कुमरे हा १५ वर्षीय मुलगा तोंडाच्या आजाराने त्रस्त होता. तो इतर मुलांसारखा खाऊ शकत नसल्याने, त्याच्या प्रकृतीवर परिणाम होत होता. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. परंतु खर्च जास्त असल्याने, लोकमतने त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. लोकमतच्या आवाहनावर स्वयंसेवी संस्थांनी गणेशच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
भंडारा येथील गणेश घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्लॅटफॉर्म शाळेत पोहचला होता. बालपणापासून गुटखा, खर्रा खात असल्याने, गणेशला १५ वर्षांच्या वयात तोंड उघडता येत नव्हते. त्यामुळे सामान्य मुलांसारखे त्याला खाता येत नव्हते. त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. परंतु त्यासाठी मोठा खर्च येणार होता. गणेशच्या आॅपरेशनसाठी पैसा गोळा करण्याकरिता प्लॅटफॉर्म शाळेच्या मुलांनी शर्थीचे प्रयत्न केले होेते. परंतु त्यांना फार यश आले नाही. सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे शहरमंत्री श्रीकांत आगलावे यांनी पुढाकार घेतला. गणेशच्या मदतीसाठी लोकमतने समाजाला आवाहन केले. यातून वीर बजरंगी सेवा संस्थेचे प्रदीप बन्सल व महेश झाडे हे पुढे आले. त्यांनी गणेशच्या संपूर्ण शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली. डॉ. मुकेश चांडक यांनी सुद्धा गणेशची प्राथमिक तपासणी करण्यास मदत केली. गणेशवर मेडिकलच्या दंत महाविद्यालयात उपचार सुरू करण्यात आले. डॉ. अभय दातारकर यांनी पुढाकार घेऊन गणेशवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर गणेशचे तोंड बऱ्यापैकी उघडत आहे. तो आता सामान्य मुलांसारखे खाऊ शकणार आहे.
गणेशच्या मदतीसाठी शाळेतील अख्खे विद्यार्थी धावून आले. दत्ता, सुनील, शरद, पीयूष, प्रितम यांनी सकाळ, संध्याकाळ त्याची काळजी घेतली. स्वप्निल मानेकर यांनी गणेशला दवाखान्यात नेण्या-आणण्यापासून त्याची देखभाल केली.

अवघ्या ५०० रुपयात आॅपरेशन
दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. अभय दातारकर यांच्या नेतृत्वात सहा डॉक्टरांच्या चमूने गणेश याच्या जबड्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत अ‍ॅनस्थेशिया देणे एक चॅलेंज होते. परंतु दंत महाविद्यालयात नुक तेच २३ लाखाचे अ‍ॅनस्थेशिया वर्कस्टेशन इन्स्टॉल करण्यात आले आहे. यावर गणेशची पहिली शस्त्रक्रिया पार पडली. ४ तासांच्या या आॅपरेशनमध्ये डॉ. सुरेंद्र डावरे, डॉ. व्यंकटेश शाहु, डॉ. सुकर्ती, डॉ. जगदीश अ‍ॅनस्थेशियातज्ञ डॉ. संजय गुल्हे व डॉ. पल्लवी मेश्राम यांचा समावेश होता. आॅपरेशन झाल्यानंतर गणेशने डॉक्टरांना विचारले किती खर्च लागला. तेव्हा डॉक्टर त्याला म्हणाले ५०० रुपयांमध्ये झाले सर्व. हे ऐकून गणेश आणखी हळवा झाला.


व्यसनमुक्तीचे काम करणार
खर्रा, गुटख्याच्या व्यसनामुळे आजार झाला होता. श्रीकांत आगलावे यांच्या मदतीमुळे आज मला पुनर्जन्म मिळाला. यापुढे आता कधीही व्यसनांच्या आहारी जाणार नाही. यापुढे माझ्या सान्निध्यात येणाऱ्या मुलांनाही व्यसनापासून परावृत्त करण्याचा मी प्रयत्न करेल.
- गणेश कुमरे
अनेकांचे लाभले सहकार्य
लहानपणापासून गणेशला बघत आलो आहे. गावावरून त्याला शाळेत आणल्यावर तो व्यसनाच्या अधीन झाला होता. प्लॅटफॉर्म शाळेतून मिळालेले संस्कार, शिस्त यामुळे त्याला अभ्यासाची गोडी लागली होती. परंतु त्याचे शरीर साथ देत नव्हते. त्याला आजारपणातून बाहेर काढण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. स्वयंसेवी संस्थेने मदत केली. लोकमत वृत्तपत्राने मदतीचे आवाहन केले. डॉ. अभय दातारकर यांनी पुढाकार घेऊन त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शाळेतील सर्व मुलांनी त्याची संपूर्ण काळजी घेतली. त्याला कधीही एकटे सोडले नाही. त्यामुळे आज गणेश या आजारातून मुक्त होऊ शकला.
- श्रीकांत आगलावे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Successful Surgery of Platform School Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.