मेंदूच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया : महिलेला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 08:34 PM2020-05-05T20:34:18+5:302020-05-05T20:38:04+5:30
मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील फुग्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘अॅन्युरिजम’ म्हटले जाते. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. यावर तातडीची शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेदरम्यान जीवहानी किंवा अपंगत्व येण्याचा धोका अधिक असतो. मात्र या आजाराचे तज्ज्ञ असलेले डॉ. प्रमोद गिरी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील फुग्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘अॅन्युरिजम’ म्हटले जाते. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. यावर तातडीची शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेदरम्यान जीवहानी किंवा अपंगत्व येण्याचा धोका अधिक असतो. मात्र या आजाराचे तज्ज्ञ असलेले डॉ. प्रमोद गिरी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान दिले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील या शस्त्रक्रियेचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.
अकोला येथील रहिवासी सुमन भाई या ४५वर्षीय महिलेचे २० एप्रिल रोजी अचानक डोके दु:खायला लागले आणि त्या बेशुद्धावस्थेत गेल्या. त्यांना अकोला येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मेंदूचा सीटी स्कॅन काढला. त्यात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. रुग्णाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले असता न्युरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी रुग्णाला तपासले. मेंदूच्या मागच्या भागात म्हणजे छोट्या मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिनीवर फुगा होऊन (अॅन्युरिजम) तो फुटून रक्तस्त्राव झाला असावा, असे त्यांनी निदान केले. परंतु या ‘अॅन्युरिजम’च्या अचूक निदानासाठी ‘४ व्हेसल डीएसए’ नावाची तपासणी करणे आवश्यक असते. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही चाचणी केली जाते. परंतु सध्या हे सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित असल्याने ही तपासणी करणे शक्य नव्हते. रुग्णाची प्रकृती पाहता जीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. स्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. गिरी यांनी आपल्या अनुभवाच्या भरवशावर ‘सीटी एन्जीओग्राफी’ या चाचणीच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी डॉ. गिरी यांनी ही शस्त्रक्रिया केली. अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असलेली ही शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. त्या महिलेला जीवनदान मिळाले. त्यांच्या या शस्त्रक्रियेत डॉ. सागर शहा, डॉ. संजोग गजभिये यांनी सहकार्य केले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या शस्त्रक्रियेला घेऊन डॉ. गिरी आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले. विशेष म्हणजे, डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा तातडीच्या शस्त्रक्रिया ‘लॉकडाऊन’मध्येही सुरू आहेत. याचा फायदा गरीब व गरजू रुग्णांना होत आहे.
जगात ‘अॅन्युरिजम’च्या आठ ते दहा रुग्णाची नोंद
मेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘न्यूरो सर्जरी’ विभागात ‘लॉकडाऊन’च्या काळातही गंभीरातील गंभीर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत २५ वर शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. यातीलच ही एक शस्त्रक्रिया आहे. ‘अॅन्युरिजम’ हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. जगात आतापर्यंत या आजाराच्या केवळ आठ ते दहा रुग्णांची नोंद आहे. यावरील शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते.
- डॉ. प्रमोद गिरी प्रमुख, न्यूरो सर्जरी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल