वाघाच्या हल्यातील चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:35+5:302021-07-27T04:09:35+5:30
नागपूर : पाच वर्षीय चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या आईच्या हिमतीचा गौरव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने केला, ...
नागपूर : पाच वर्षीय चिमुकलीला वाघाच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या आईच्या हिमतीचा गौरव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने केला, सोबतच जखमी मुलीवर यशस्वी उपचार करीत नवे जीवनही दिले. सोमवारी चिमुकलीला रुग्णालयातून निरोप देताना अधिष्ठात्यांसह डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
वाघाचा हल्ला परतवून लावणाऱ्या त्या आईचे नाव अर्चना तर वाघाच्या जबड्यातून सुटलेल्या लेकीचे नाव प्राजक्ता मेश्राम आहे. वाघाच्या जबड्यात प्राजक्ता असताना बांबूच्या काठीने आईने वाघावर हल्ला बोलत वाघाला पिटाळून लावले. यात प्राजक्ता वाचली. परंतु चेहऱ्याचे हाड, जबडा तुटला. सुरुवातीला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात यावर उपचार केले. परंतु पुढील उपचारासाठी तिला नागपूरच्या शासकीय दंत रुग्णालयात पाठविले. येथील मुखशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांनी प्राजक्ताला तपासले. चेहऱ्याचा तुटलेल्या हाडामुळे मेंदूची नस दबल्याने ‘फेशियल पाल्सी’ म्हणजे, चेहऱ्याचा पक्षाघात झाल्याचे आणि उजवा डोळाही बंद होत नसल्याचे दिसून आले. १९ जुलै रोजी डॉ. दातारकर यांनी चेहऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. १० दिवसाच्या उपचारानंतर आज तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शस्त्रक्रियेत डॉ. श्वेता कांबळे, डॉ. पल्लवी मेश्राम, डॉ. सुरेंद्र डावरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. वंदना गाडवे, परिचारिका आशा राठोड, मिलिंद रामटेके, विनोद पानतावणे, प्रभू सोनटक्के, गायत्री बघेल आदींनी सहकार्य केले. वाघाच्या जबड्यातून मुलीला सोडविणाऱ्या मातेचा गौरव अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. वसुंधरा भड व डॉ. वैभव कारेमोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.