राज्यातील वृक्षलागवड मोहीम यशस्वी; 33 कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:45 PM2019-09-25T16:45:38+5:302019-09-25T16:47:04+5:30
राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या यावर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर रोजी ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
हरित महाराष्ट्रही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. २०१६ मध्ये १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले होते. वृक्षरोपणाच्या या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यात २ कोटी ८३ हजार इतकी वृक्षलागवड करण्यात आली. २०१७ मध्ये १ ते ३० जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प होता. यावर्षीसुद्धा ५ कोटींहून अधिक झाडे राज्यात लावण्यात आली. २०१८ मध्ये १ ते ३० जुलैदरम्यान १३ कोटींच्या वृक्षलागवडीचा निर्धार करण्यात आला होता. या योजनेलाही जनतेने उदंड प्रतिसाद दिला. यावर्षी १५ कोटी ८८ लक्ष झाडे लावण्यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केले होते.
बुधवारी राज्यात ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ इतकी झाडे लावल्याची नोंद दुपारी करण्यात आल्याने या वर्षीचाही निर्धार पूर्णत्वास केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३ वर्षात ५० कोटी वृक्षांच्या लागवडीचे व्रत पूर्णत्वास नेले आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी राज्यातील नागरिकांना दिले असून, हे लोकसहभागाचेच यश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांप्रती आभार व्यक्त केले आहेत.