१४ महिन्यांपूर्वी झाले यशस्वी परिक्षण पण...; तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे 'कवच'च नाही
By नरेश डोंगरे | Published: June 4, 2023 03:26 PM2023-06-04T15:26:18+5:302023-06-04T15:30:43+5:30
भारतीय रेल्वेची क्रांती गुलदस्त्यात : लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
नागपूर : भारतीय रेल्वेतील 'क्रांती' म्हणून प्रचंड गाजावाजा झालेल्या 'कवच' टेक्नॉलॉजीला रेल्वेने गुंडाळून ठेवले की काय, असा संतप्त प्रश्न चर्चेला आला आहे. एकाच पटरीवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर धावत असल्या तरी त्या एकमेकांवर धडकणार नाही. तर, या दोन्ही गाड्या सुरक्षित अंतरावर उभ्या राहतील, अशी तजवीज 'कवच'मुळे होत होती. मात्र, लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले हे ‘कवच’च शेकडो रेल्वेगाड्यांना लावण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
भारतीय रेल्वेचा अलीकडच्या काळातील सर्वात भीषण अपघात ओडिशातील बालासोरमध्ये २ जूनच्या रात्री घडला. तेव्हापासून या अपघाताची कारणमीमांसा वजा तपासणी सर्वत्र चर्चेला आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर झोनमधून चालणाऱ्या दोनशेवर रेल्वेगाड्यांमध्येे 'सुरक्षा कवच' नसल्याचे अर्थात लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालून या रेल्वेगाड्या चालविल्या जात असल्याचे प्रचंड धक्कादायक तेवढेच संतापजनक वास्तव चर्चेला आले आहे.
रेल्वेगाड्या एकमेकांवर धडकण्याचा धोका टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कवच टेक्नॉलॉजी रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ)ने सोबत मिळून विकसित केले होते.
'कवच'ची कमांड थेट रेल्वेगाडीचे इंजिन आणि रेल्वेलाइनशी कनेक्ट होते. त्यामुळे दोन रेल्वेगाड्या कितीही वेगात एकाच पटरीवरून समोरासमोर (परस्पर विरोधी दिशेने) धावत येत असेल तरी त्या एकमेकांवर धडकणार नाही. कारण कवच टेक्नॉलॉजीमुळे दोन्ही गाड्यांच्या इंजिनमध्ये असलेले ट्रान्समिटर पटरी (रूळ) कनेक्टिव्हिटीमुळे लोकेशन ट्रेस करेल आणि रेल्वेगाडीचे इंजिन साडेतीनशे ते चारशे मीटर दूरच दोन्ही गाड्यांना अॅटोमेटिक थांबवून देईल. परिणामी अपघात होणार नाही.
रेल्वेने त्यावेळी केलेल्या या दाव्याची पडताळणीही अनेकदा झाली होती. याची पहिली ट्रायल २०१६ मध्ये तर दुसरी महत्त्वाची ट्रायल मार्च २०२२ मध्ये झाली होती. त्यावेळी एका गाडीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि दुसऱ्या गाडीत खुद्द रेल्वे बोर्डाचे चेअरमन बसले आणि या दोन्ही गाड्या एकाच पटरीवर समोरासमोर चालविण्यात आल्या. मात्र, 'कवच' टेक्नॉलॉजीमुळे या दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्या नाही, तर त्या ३८० मीटर दूर आपोआप थांबल्या. अशा प्रकारे १४ महिन्यांपूर्वी कवचचेे परीक्षण यशस्वी झाल्यानंतर 'भारतीय रेल्वेतील क्रांती' म्हणून 'कवच टेक्नॉलॉजी'चा प्रचंड गवगवा करण्यात आला होता. गाड्यांना कवच असले आणि चुकून कुण्या ट्रेनने सिग्नल जंपिंग केले तरी, धोक्याचा इशारा मिळेल आणि तेथून ५ किलोमीटरच्या परिसरातील दुसऱ्या रेल्वेगाड्यांची हालचाल बंद होईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.
क्या हुवां तेरा वादा?
साऊथ सेंट्रल रेल्वेच्या १४४५ किलोमीटर रुटवर धावणाऱ्या ७७ रेल्वेगाड्यांमध्ये तसेच दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडोरमध्ये कवच सिस्टम लावण्याचे काम सुरू आहे आणि ते झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये लावण्याचे डिसेंबर २०२२ मध्ये रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, अनेक गाड्यांमध्ये ते अजून का लागले नाही, ते कळायला मार्ग नाही.
म्हणून निर्दोष व्यक्तींवर मृत्यूने घातला घाला
नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर झोनमधून धावणाऱ्या ३४९ रेल्वेगाड्यांत तर देशातील विविध भागांत धावणाऱ्या अनेक गाड्यांत ही अत्यंत महत्त्वाची अन् अत्यावश्यक 'कवच सिस्टम' लावण्यात आली नाही. त्याचमुळे ओडिशात भयावह अपघात होऊ तीनशेच्या आसपास निर्दोष व्यक्तींवर मृत्यूने घाला घातला. शेकडो जणांना जीवघेण्या जखमाही दिल्या.