एचआयव्ही बाधितांची अशीही थट्टा!
By Admin | Published: December 1, 2014 12:48 AM2014-12-01T00:48:20+5:302014-12-01T00:48:20+5:30
एचआयव्ही बाधितांना व्हायरल लोड मशिनवर चाचणी करण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यातच या चाचणीचा अहवाल मिळण्यास २० दिवसांच्यावर कालावधी लागत असल्याने एचआयव्ही बाधितांच्या
व्हायरल लोड मशीनअभावी गाठावी लागते मुंबई : अहवालासाठी लागतात २० दिवस
नागपूर : एचआयव्ही बाधितांना व्हायरल लोड मशिनवर चाचणी करण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यातच या चाचणीचा अहवाल मिळण्यास २० दिवसांच्यावर कालावधी लागत असल्याने एचआयव्ही बाधितांच्या उपचारास उशीर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
एचआयव्ही बाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी शासनाने मेडिकलमध्ये २००५ मध्ये ‘एआरटी’ केंद्र सुरू केले. सध्या या केंद्रावर सुमारे २४ हजार एचआयव्ही बाधितांची जबाबदारी आहे. यात रोज पाच ते सहा नव्या रुग्णांची भर पडत आहे. यातच दोन वर्षांपूर्वी ‘सेकंड लाईन’ उपचार पद्धतीही सुरू झाल्याने रुग्णांची गर्दीही वाढली आहे. मात्र आजही रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागत असल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी शासनाकडून कुठलीही सवलत मिळत नाही. अनेक रुग्ण रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करतात.
आधीच रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपत नाही. यातच या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबई गाठावी लागते. या शिवाय मुंबईतल्या व्हायरल लोड मशीनवर नागपुरातील रुग्णाच्या वेटिंगने शंभरी गाठली आहे. रुग्णाला तीन दिवस थांबावे लागते. या चाचणीचा अहवाल येण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. परिणामी अनेक गरीब रुग्ण मुंबईला जाण्याचे टाळतात, तर काहींवर उपचार सुरू होण्यास उशीर होत असल्याने रुग्ण दगवण्याचा धोका बळावतो.(प्रतिनिधी)
एआरटी सेंटरमध्ये सोयींचा अभाव
मेडिकमलमध्ये ओपीडी विभागाच्या पहिल्या माळ्यावर एआरटी सेंटर आहे. परंतु येथे एचआयव्ही बाधितांसाठी विशेष सोय नाही. येथे बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. रुग्ण दाटीवाटीने बसतात. वास्तविक एचआयव्ही बाधितांमध्ये प्रतिकार शक्ती राहत नाही. यामुळे क्षयरोग, त्वचा रोग, व्हायरल फ्लू सारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. या सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंत सुुविधांचा अभाव आहे . रु ग्णांच्या तपासणीचा सगळा भार अपुऱ्या स्टाफवर आहे. प्रायव्हेट कौन्सिलींग रूमही नसल्याने एड्स बाधितांच्या गोपनीयतेचा भंग होत आहे .