पवारांसारख्या नेत्याला निवडणुका पाहुन अशी वक्तव्ये शोभत नाही
By कमलेश वानखेडे | Published: August 28, 2024 06:11 PM2024-08-28T18:11:34+5:302024-08-28T18:12:36+5:30
देवेंद्र फडणवीस यांची टीका : सिंधुदुर्ग प्रकरणी नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस कारवाई
नागपूर : शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्ही ने तयार केला. राज्यसरकारने तयार केला नाही. हे पवार यांना माहीत आहे. भ्रष्टाचार कुठेच नको. त्याला शरद पवार काय तर सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. मात्र, पवार यांच्यासारख्या नेत्याला निवडणुका पाहून असे वक्तव्य करणे शोभत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मालवणच्या घटनेवर कोणीच राजकारण करू नये. निशचितपाने ही घटना कमीपणा आणणारी व दुःखद आहे. एकत्र योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. नेव्हीने गांभीर्याने घेऊन चौकशी टीम तयार केली आहे. ते पाहून गेले आहेत. नेव्ही दोषींवर कारवाई करेल. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केली आहे. नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस कारवाई करेल. जे सिव्हिलीयन त्या टीममध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी या मुद्यावरून राजकरण सुरू केले आहे. निवडणुकाच्या चष्म्याने पाहायचे असे करून राजकारण करू नये. या विषयाचे राजकारण करणे महाराष्ट्राला शोभत नाही, अशी नाराजीही फडणवीस यांनी व्यक्त केली.